मुंबई, वृत्तसंस्था | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असतानाच शिवसेनेकडूनही काही उमेदवारांची संभाव्य यादी निश्चित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यानुसार, आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे कळले आहे.
शिवसेना-भाजपची युती अंतिम टप्प्यात असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. यातच शिवसेनेकडून काही नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढणार असून ते ३ ऑक्टोबर रोजी आपला निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या वृत्ताला दुजोरा मिळाला नसून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अधिकृतपणे शिवसेना उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेनेने घटस्थापनेचा मुहुर्त साधत सेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्मचे वाटप केले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चारही आमदारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तसेच संजय घाटगे (कागल), संग्रामसिंह कुपेकर (चंदगड), राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), डॉ.सुजित मिचणेकर (हातकणंगले), सत्यजीत पाटील (शाहुवाडी), प्रकाश आबिटकर (राधानगरी), उल्हास पाटील (शिरोळ) यांनाही फॉर्म देण्यात आले आहेत. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय शिरसाट, दापोली मतदारसंघातून योगेश कदम, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.