जळगाव प्रतिनिधी । शहरातील व.वा. वाचनालयासमोर लावलेली दुचाकी सोमवारी सायंकाळी चोरून पळून जात असतांना चोरट्यास परीसरातील नागरीकांना पकडून शहर पोलीसांच्या ताब्यात दिले. चोरट्याविरोधात दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील खंडेराव नगरातील रहिवाशी रविंद्र आनंदा शिंदे (वय-44) हे व.वा. वाचनालयासमोर वॉचमनचे काम करतात. शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास चोरटा करणसिंग जितेंद्रसिंग गोवे (वय-23) रा. चिखली ता.पाटोदा जि. बीड हा धरणगाव येथे सासऱ्याच्या गावी जाण्यासाठी दुचाकी चोरून पळ काढला. त्यावेळी रविंद्र शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक तरूणांनी त्यांचा पाठलाग केला. त्याला नवीन बसस्थानकाजवळील भजे गल्लीत अडवून सुरूवातीला जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यांनी हा गुन्हा शहर पोलीसांच्या हद्दीत घडल्याने संशयित आरोपी गोवे याला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या विरोधात दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गणेश शिरसाळे करीत आहे.