नाशिक प्रतिनिधी । उध्दव ठाकरे यांना निवृत्तीनाथ युतीसाठी सुबुध्दी देवो अशा शब्दात आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना टोला मारला आहे.
संत निवृत्तीनाथ यांच्या समाधीस्थळी आज पहाटे नाशिकचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी सपत्नीक शासकीय पूजा केली. पूजा आटोपल्यानंतर ना. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना आपण संत निवृत्तीनाथ यांच्याकडे दुष्काळ निवारणासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी अन्य विषयांवरही मत व्यक्त केले. कालपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरू केले असून त्यांनी ना. महाजन यांची विनंती अमान्य केली आहे. यावर बोलतांना गिरीश महाजन म्हणाले की, अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यामुळे आता उपोषणाचे कोणतेही औचित्य नाही, तसेच अण्णांचे वय झाल्यामुळे त्यांना हे उपोषण झेपणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अण्णांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. याप्रसंगी युती व्हावी अशी सर्वांची इच्छा असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. उध्दव ठाकरे यांनी युतीबाबत ताठर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमिवर, युतीसाठी निवृत्तीनाथ यांनी उध्दव ठाकरे यांना सुबुध्दी द्यावी असा टोलादेखील त्यांनी याप्रसंगी मारला.