लवकर या…लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

lala

मुंबई प्रतिनिधी । ‘कोण आला रे कोण आला लालबागचा राजा आला’, ‘ही शान कुणाची मुंबईच्या राजा’ची अशा घोषणा देत मुंबईची शान असलेला लालबागचा राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात आज सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचली. यानंतर समुद्रात ‘लालबागच्या राजा’चे शाही विसर्जन करण्यात आले असून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’च्या गजरात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील लालबागमध्ये गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास लालबागच्या राजाची आरती घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपारिक वेषातच भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. कुठे ढोलताशांचा दणदणाट… कुठे फटाक्यांची आतषबाजी… तर कुठे गुलालाची उधळण… आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष… अशा भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक सुरू होती. दरवर्षी प्रमाणे अत्यंत शिस्तबद्धपणे निघालेल्या या मिरवणुकीचे फुले वाहून ठिकठिकाणी स्वागत आणि पूजा करण्यात आली. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर मुंबईकरांनी अलोट गर्दी केली होती. ज्या ज्या मार्गावरून लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली तो रस्ता गुलालाने न्हाऊन निघाला होता. अनेकजण या नयनरम्य मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात मग्न झाले होते, तर काहीजण मिरवणुकीसोबत सेल्फी काढण्यात गुंग झाले होते. तब्बल २१ तासांच्या उत्साहपूर्ण, जल्लोषात आणि ढोलताशांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणुकीनंतर ‘लालबागच्या राजा’चे गिरगावच्या समुद्रात शाही विसर्जन करण्यात आले.

Protected Content