जळगाव, प्रतिनिधी | शासनाचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. शिक्षण क्षेत्रात सुविधादेखील व्यवस्थित दिल्या जात नाहीत. हे शिक्षणाच्या दृष्टीने दुर्दैव आहे, असे प्रतिपादन माजी आमदार सुधीर तांबे यांनी केले.जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे बन्सीराम व तायाप्पा खराले यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय आदर्श शाळा व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारांचे वितरण रविवारी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी शिक्षकेतरांचे महामंडळ, पुणेचे राज्य सहकार्यवाहक शिवाजीराव खांडेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ट महाविद्यालय शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास सोनावणे, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एच. जी. इंगळे, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, नंदूरबारचे जिल्हाध्यक्ष डी. पी. महाले, रायगडचे रणवीर राज, ग.स.सोसायटीचे संचालक टी. जी. बोरोले, मुख्याध्यापक सी.सी. वाणी, एस. जे. वाणी, साधना लोखंडे, विनोद गोरे, सुनील गरुड, शैलेश राणे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर खराले उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानेश्वर खराले यांनी केले. आदर्श शाळा आणि उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी बोलताना माजी आ. सुधीर तांबे म्हणाले की, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती दिली जात नाही. शासन आकृतीबंध करत नाही. अनेक पदे शासनाने कमी केले आहेत. शिक्षकेतर कर्मचा-यांनी अनेकदा आंदोलने केली आहे. या काळात सदैव सोबत राहिलो आहे, असेहि तांबे यांनी सांगितले. पुरस्कारार्थीमधून बाळकृष्ण जडे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात शिवाजी खांडेकर यांनी पुरस्कार देण्यामुळे चांगल्या कार्याला प्रेरणा मिळते असे सांगितले. सूत्रसंचालन अतुल धनजे, आभार सचिव संदीप डोलारे यांनी केले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष उत्तम चौधरी, संभाजी अस्वार, सेवक उपाध्यक्ष भूषण पाठक, कोषाध्यक्ष लखीचंद पाटील, एल. एस.पाटील आदींनी कामकाज पहिले.
यांचा झाला सन्मान
आदर्श शाळा म्हणून कठोरा ता.चोपडा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयासह उत्कृष्ट कर्मचारी म्हणून रावेर येथील के.एस.मुलींचे विद्यालय येथील मुख्य लिपिक प्रकाश राजाराम बेलस्कर, थोरगव्हाण येथील डी.एस.देशमुख विद्यालयाचे ग्रंथपाल भीमराव देवचंद गिरडे, ऐनपूर येथील पटेल विद्यालयाचे चंद्रगुप्त बाळू भालेराव, भडगाव येथील सु.गी.पाटील विद्यालयाचे सेवक बाळकृष्ण शांताराम जडे, पाळधी ता.जामनेर येथील सेवक संदीप पुरुषोत्तम ठोंबरे यांचा मान्यवरांनी प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, भेटवस्तू, शाल देवून गौरव केला.