जळगाव, प्रतिनिधी | येथिल सुगत तथागत महाविहार आणि संत चोखामेळा वसतिगृहाच्या आवारातील व सिंधी कॉलनी रोड वर स्थित असणारे बौद्ध धर्मीय विहारात वर्षा ऋतूत महत्व असणारे वर्षावास या कार्यक्रमाचे आयोजन आषाढ महिन्यापासून सुरू आहे. जे मार्गशिष महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे.
यात प्रत्येक रविवारी सकाळी ९ वाजता सामुदायीक वंदना, धम्मदेसना, व विपश्यनावर मार्गदर्शन केले जाते. बौद्ध भिक्खु गणास धम्मप्रचार व प्रसार करण्यास सूचना केली जाते.वर्षावास चे महत्व हे बौद्ध धर्मात महत्वाचे आहे आणि त्या अनुषंगाने पूज्य भदंत एन सुगतवंसजी (महाथेरो संघनायक महाराष्ट्र राज्य) यांनी गेल्या अनेक वर्षात सदर बुद्ध महाविहाराचे चित्र पालटले आहे. जिल्ह्यातील जनसमुदाय, धर्मशील व कल्याणकारी लोकांनी आर्थिक मदत करीत या महाविहाराची भव्यदिव्य अशी वास्तू उभारली आहे. या महाविहारात साडे पाच फूट एवढी मोठी महाकाय बुद्धमूर्ती बसवून, लहान लहान आतापर्यंत होऊन गेलेल्या २८बुद्धांच्या मूर्त्याही बसवल्या आहेत. अश्या या महाविहारात बाल संस्कार, बौद्धधर्मविधि, आणि ध्यानसाधना, विपश्यना सह आता वर्षावासाचे आयोजन ही करण्यात आले आहे. तसेच एकदिवसीय उपोसथ शिबिर ज्यात संपूर्ण दिवसभर धम्म ज्ञान देण्यात येतात.पूज्य भदंत महाथेरो सुगतवंसजी यांनी वर्षावासाचे महत्व विशद करतांना प्रत्येकाने वर्षावास च्या दिवसात अनुजानामी भिक्खवे वस्साणे वस्सं उपगन्तु म्हणजे हे भिक्खु आपण या पावसाळ्याच्या कालावधीत सलग ३ महिने वर्षावास करून पुण्य संपादन करून घ्यावे असे सांगितले. त्याच बरोबर सर्वांनी आपल्या शील, समाधी,व प्रज्ञा धारण करून नित्यनियमाणे पालन करावे म्हणजे सुखी आयुष्य होईल असे प्रतिपादन केले.