काश्मीर : इंटरनेट बंदीतही गिलानीचा टिवटीवाट सुरूच ?

Syed Ali Gilani

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा बंद असताना फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी याचे ट्विटर अकाउंट सुरूच आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘बीएसएनएल’ने याची गंभीर दखल घेत दोन अधिकारी निलंबित केले आहेत.

 

जम्मू-काश्मीरमध्ये केवळ एका दिवसासाठी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणांसाठी आणि सोशल मीडियावरून अफवांना आळा घालता यावा यासाठी या ठिकाणची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. परंतु, इंटरनेट सेवा बंद असताना फुटीरतावादी नेता गिलानी याचे ट्विटर अकाउंट सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेट बंदी असताना गिलानीच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट होत आहेत. इंटरनेट बंदीनंतर सुद्धा सय्यद अली शाह गिलानी यांना अॅक्सेस देणाऱ्या बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांवर संशय आहे. गिलानीला त्यांनी इंटरनेटचा अॅक्सेस दिला आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे अकाउंट त्यांचे अधिकृत आहे की नाही, याचाही तपास करण्यात येत आहे. परंतु, त्यांच्या नावाच्या ट्विटरवरून सतत भारत विरोधी पोस्ट केल्या जात आहेत.

Protected Content