Home Cities जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

0
2


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३६ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव महानगर शाखेच्या वतीने त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांना अभिवादन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी आणि महानगर जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही त्यांच्या महान कार्याप्रती आदर व्यक्त केला.

कार्यक्रमात जळगाव जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील थोर समाजसुधारक, विचारवंत आणि शिक्षणप्रेमी होते, असे सांगितले. समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उठविला. त्यामुळेच त्यांना समाजसुधारणेच्या अग्रदूतांमध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले, असे त्यांनी नमूद केले.

महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाला विशेष महत्त्व दिले. पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी शाळा सुरू करून शिक्षणाचा मार्ग खुला केला. त्या काळात मुलींना शिक्षण देणे हे मोठे धाडस होते. तसेच शेतकरी, दलित आणि गरीब जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजात समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असे महाजन यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन समानता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश देणारे असून, त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजाने प्रगतिशील मार्गाने वाटचाल करणे आवश्यक असल्याचे मनोगतातून व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी महानगर जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महानगर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, राजुभाऊ मोरे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष रमेश बारे, महानगर जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, गणेश पाटील, उत्तमशिंदे, गिरीश सांगळे, विशाल देशमुख, राजु बाविस्कर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound