Home आरोग्य मध्यरात्री आमदार अमोल जावळे यांचा एका फोनवरून धावता प्रतिसाद ; मंत्री गिरीश...

मध्यरात्री आमदार अमोल जावळे यांचा एका फोनवरून धावता प्रतिसाद ; मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात

0
2


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । टाकरखेडा येथील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना रुग्णालयातील थकीत बिलामुळे मृतदेह ताब्यात घेण्यात अडचण येत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी नातेवाईकांनी रात्री उशिरा आमदार अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधला. एका फोनवर मदतीसाठी पुढाकार घेत आमदार जावळे यांनी मध्यरात्रीपर्यंत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनीही रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून हस्तक्षेप केला. अखेर २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि पाटील कुटुंबीयांना दिलासा मिळाला.

यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील रहिवासी संजय मुरलीधर पाटील (वय ५३) यांचे २६ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथील ग्लेनीगल्स रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा ट्रस्टच्या मदतीने तसेच स्वतःच्या खर्चातून त्यांच्या उपचारांवर आतापर्यंत सुमारे २५ ते २७ लाख रुपये खर्च झाले होते.

२६ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता संजय पाटील यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, उर्वरित बिलापोटी ४ लाख ९९ हजार ६४५ रुपये भरल्याशिवाय मृतदेह देण्यास अडचण असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आल्याचे नातेवाईकांनी नमूद केले. आधीच उपचारांसाठी मोठा खर्च झाल्याने आणि कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवल्याने नातेवाईकांसमोर मोठे संकट उभे राहिले.

या अडचणीच्या काळात नातेवाईकांनी रात्री दहा वाजता आमदार अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थिती सांगितली. सर्व हकीकत ऐकल्यानंतर आमदार जावळे यांनी मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रात्री दहा वाजल्यापासून पहाटे दीड वाजेपर्यंत त्यांनी आरोग्य विभागातील विविध अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा केली. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात मिळावा आणि तो टाकरखेडा येथे आणता यावा, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. पहाटे पाच वाजताही आमदार जावळे यांनी पुन्हा नातेवाईकांशी संपर्क साधून परिस्थितीची विचारपूस केली. रुग्णालयातील कर्मचारी सकाळी आल्यानंतर त्यांच्याशी पुन्हा चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सकाळी त्यांनी जळगाव जिल्ह्याचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

गिरीश महाजन यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर मृतदेह कोणतीही रक्कम न भरता कुटुंबीयांच्या ताब्यात मिळवून देण्याचा विश्वास देण्यात आल्याचे सांगण्यात आले. अखेर २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता रुग्णालय प्रशासनाने संजय पाटील यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर पाटील कुटुंबीय मृतदेह घेऊन टाकरखेडाकडे रवाना झाले.  एका कार्यकर्त्याच्या अडचणीच्या वेळी मध्यरात्रीही फोनला प्रतिसाद देत मदतीसाठी प्रयत्न करणारे आमदार अमोल जावळे आणि या प्रकरणात हस्तक्षेप करून मार्ग काढणारे मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी संकटाच्या प्रसंगी नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याची चर्चा या घटनेनिमित्त परिसरात होत आहे.


Protected Content

Play sound