Home Cities अमळनेर कळमसरेच्या रामनाम पाझर तलावाच्या कामाला गती मिळण्याची आशा – माजी सरपंच मुरलीधर...

कळमसरेच्या रामनाम पाझर तलावाच्या कामाला गती मिळण्याची आशा – माजी सरपंच मुरलीधर महाजन यांचा पुढाकार

0
1


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कळमसरे (ता. अमळनेर) येथील रामनाम पाझर तलावाच्या कामाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी माजी सरपंच मुरलीधर राजाराम महाजन यांनी पुढाकार घेतला असून, खासदार स्मिता उदय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मृद व जलसंधारण विभागाचे कनिष्ठ अभियंता मयूर साळुंखे यांनी नुकतीच तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीमुळे तलावाच्या खोलीकरणासह पुढील कामाला गती मिळण्याची अपेक्षा शेतकरी आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

रामनाम पाझर तलावाचे काम पूर्णत्वास नेऊन कळमसरे परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध करून देण्याचा मुरलीधर महाजन यांचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी खासदार स्मिता वाघ यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता मयूर साळुंखे यांनी तलावस्थळी भेट देऊन सद्यस्थितीची माहिती घेतली. यावेळी तलावात सध्या उपलब्ध होणारा जलसाठा, तलावाचे खोलीकरण केल्यानंतर निर्माण होऊ शकणारी जलसाठवण क्षमता आणि परिसरातील भौगोलिक परिस्थिती यांची प्राथमिक पाहणी करण्यात आली. प्रस्तावित कामाच्या दृष्टीने आवश्यक बाबींची माहिती घेण्यात आली असून, पुढील दिशा ठरविण्यासाठी या पाहणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

यापूर्वीही माजी सरपंच मुरलीधर महाजन आणि त्यांच्या तत्कालीन ग्रामपंचायत टीमने ग्रामस्थांच्या सहकार्याने रामनाम पाझर तलावाच्या पुनर्जीवनासाठी प्रयत्न केले होते. गावकऱ्यांच्या सहभागातून तलावाची स्थिती सुधारण्यासाठी काही कामे करण्यात आली होती. आता तलावाच्या कामाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा आणि त्यासाठी आवश्यक पुढील कार्यवाही व्हावी, यासाठी महाजन यांनी पुन्हा पुढाकार घेतला आहे. रामनाम पाझर तलावाचे खोलीकरण आणि संबंधित काम पूर्ण झाल्यास कळमसरे व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. तलावात पाणीसाठा वाढल्यास भूजल पातळी सुधारण्यास मदत होईल. परिणामी विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता वाढण्याची शक्यता असून, शेतीसाठी अधिक विश्वासार्ह जलस्रोत निर्माण होऊ शकतो. यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला आधार मिळून परिसरातील कृषी उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश असल्याचे मुरलीधर महाजन यांनी स्पष्ट केले आहे. या कामासाठी गावातील मान्यवर, शेतकरी आणि ग्रामस्थांचेही सहकार्य मिळत आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाकडून पुढील कार्यवाही झाल्यास तलावाच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या पाहणीप्रसंगी अरुण चौधरी, चुनीलाल महाजन, भैया महाजन, रणजितसिंग दादा, मेहमूद पठाण, जितेंद्र महाजन, किशोर चौधरी, भरत महाजन, गजानन महाजन यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Protected Content

Play sound