Home Cities जळगाव संविधान दिनी भाषणाऐवजी कृतीतून संदेश ! अन्यायग्रस्त उपोषणकर्त्यांच्या पाठीशी एकता संघटना ठामपणे...

संविधान दिनी भाषणाऐवजी कृतीतून संदेश ! अन्यायग्रस्त उपोषणकर्त्यांच्या पाठीशी एकता संघटना ठामपणे उभी

0
1


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संविधान दिन केवळ भाषणे आणि कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता, अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने लढणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे हीच संविधानिक मूल्यांची खरी जपणूक आहे, असा संदेश एकता संघटना जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या नागरिकांची भेट घेऊन संघटनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच त्यांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी केली.

१६ नोव्हेंबरपासून श्री. रोहित भालचंद्र पाटील, आनंद सखाराम पाटील आणि श्री. संजय भिका महाजन हे विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मागण्यांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाशी संबंधित प्रश्न, शिक्षण विभागाशी निगडित कथित अन्याय-अत्याचार तसेच संबंधित पोलीस यंत्रणेकडून योग्य कारवाई होत नसल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. या प्रश्नांवर संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.

संविधान दिनानिमित्त एकता संघटनेचे पदाधिकारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत उपोषणस्थळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी तिन्ही उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, तसेच तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली. दरम्यान, एकता संघटनेचे फारूक शेख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची माहिती देत या प्रकरणात त्वरित लक्ष घालून हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांनी केली. पालकमंत्र्यांनी या विषयाची दखल घेण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

उपोषणस्थळी शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच भडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारीही दाखल झाले होते. मात्र, केवळ भेटी देणे आणि आश्वासने देणे पुरेसे नसून उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होणे आवश्यक आहे, असे संघटनेने स्पष्ट केले. संबंधित यंत्रणांनी तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. हे अधिकार प्रत्यक्षात सुरक्षित राहण्यासाठी अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देणे ही प्रशासनासह समाजाचीही जबाबदारी आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एखाद्या नागरिकाला अनेक दिवस उपोषण करावे लागत असेल, तर ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे एकता संघटनेने नमूद केले.

संघटना कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधात आकसापोटी भूमिका घेत नसून, अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा आणि प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडावी, या उद्देशाने उपोषणकर्त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संविधान दिनाच्या निमित्ताने केवळ विचार मांडण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून न्याय, समानता आणि बंधुतेची मूल्ये जपण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी एकता संघटनेचे मुफ्ती खालिद, मुफ्ती अतिकुर रहमान, हाफिज रहीम पटेल, फारूक शेख, मतीन पटेल, आरिफ देशमुख, जफर मिर्झा, नजमुद्दीन शेख, साबीर खलील, दानियल शेख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound