अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिराने आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मंदिरातील भाविकांना विविध धार्मिक विधी, पूजा बुकिंग, महाप्रसाद आणि महत्त्वाच्या सूचनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी डिजिटल नोटीस बोर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेसाठी विकसित करण्यात आलेल्या ‘मंगल टीव्ही ॲप’ची शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी मंदिरासमोरील टीव्हीवर यशस्वी चाचणी घेण्यात आली.
डिजिटल नोटीस बोर्ड कार्यान्वित करण्यासाठी अँड्रॉईड टीव्हीवर ‘पर्मनंट ऑटो कंट्रोल’ ॲप इन्स्टॉल करण्यात आले आहे. या माध्यमातून मंदिरातील विविध प्रकारची माहिती थेट टीव्ही स्क्रीनवर प्रदर्शित करणे शक्य झाले आहे. ‘मंगल टीव्ही ॲप’च्या साहाय्याने मंदिरातील दैनंदिन व्यवस्थापन आणि भाविकांना माहिती देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व आधुनिक होणार आहे. या डिजिटल व्यवस्थेमध्ये मंदिरातील महत्त्वाच्या सूचना आणि डिजिटल नोटीस, महाप्रसाद काऊंटिंग व प्रतीक्षा स्थिती, अभिषेक पूजेचे बुकिंग व वेटिंग, हवनात्मक शांतीपूजेची प्रतीक्षा माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय विविध पूजा आणि धार्मिक विधींची माहितीही भाविकांना टीव्ही स्क्रीनवर पाहता येणार आहे.

विशेष म्हणजे, मंदिरातील जाहिराती आणि प्रायोजकांची माहिती, यूट्यूब व्हिडिओ तसेच इतर व्हिडिओ लिंक्स आणि मंदिराशी संबंधित विविध डिजिटल माहितीही या ॲपद्वारे प्रदर्शित करता येणार आहे. त्यामुळे भाविकांना आवश्यक माहिती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करण्याची गरज कमी होणार आहे. शनिवारी मंदिरासमोरील टीव्हीवर या संपूर्ण प्रणालीची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. यावेळी ॲप व्यवस्थित कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. डिजिटल नोटीस बोर्डच्या माध्यमातून मंदिरातील विविध सेवा, धार्मिक कार्यक्रम आणि प्रतीक्षा व्यवस्थेची माहिती अधिक प्रभावीपणे भाविकांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.



