Home प्रशासन पदोन्नतीतील आरक्षण आणि जुनी पेन्शनसाठी २५ नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय आंदोलन

पदोन्नतीतील आरक्षण आणि जुनी पेन्शनसाठी २५ नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय आंदोलन

0
2

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील विविध सरकारी विभागांमध्ये मागासवर्गीयांच्या सुमारे अडीच लाख जागा अद्याप रिक्त असल्याचा दावा करत या जागा तातडीने भरण्यासह पदोन्नतीतील आरक्षण, जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर बुधवारी, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्यस्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात राज्यभरातील मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१७ पासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नावर शासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली, बैठका घेण्यात आल्या तसेच विविध आंदोलने करून पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने पात्र अधिकारी आणि कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने १५ जून २०१८ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनानेही या विषयावर योग्य निर्णय घ्यावा, अशी संघटनेची मागणी आहे. पदोन्नतीतील अडथळे दूर करून पात्र कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका महासंघाने मांडली आहे.

सरकारी विभागांतील रिक्त आरक्षित पदे नियमानुसार भरावीत, नियमित नोकरभरती प्रक्रिया राबवावी आणि कंत्राटी भरतीच्या धोरणाचा पुनर्विचार करावा, या प्रमुख मागण्यांचाही आंदोलनात समावेश आहे. मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या जागा दीर्घकाळ रिक्त राहिल्याने संबंधित प्रवर्गातील उमेदवारांना रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा संघटनेकडून उपस्थित करण्यात येत आहे. याशिवाय, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विविध संवर्गांतील वेतन त्रुटी दूर कराव्यात आणि पदोन्नती प्रक्रियेतील अडथळे दूर करावेत, अशी मागणी करण्यात येणार आहे. वाहनचालक आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करणे, तसेच दिव्यांग शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविणे या मुद्द्यांवरही आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार आहे. राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी केले आहे.

नाशिक विभागातूनही या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक कोषागार विभागाचे नेते तथा कामगार नेते रविंद्र गायकवाड यांनी दिली. जळगाव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष रविंद्र तायडे, जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विज्ञान सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश अडकमोल, जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रमोद लोंढे, जलसंपदा विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे, महसूल विभागाचे जिल्हाध्यक्ष महेश सपकाळे, महानगरपालिका विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश वाडे आणि वनविभागाचे विकास सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound