Home Cities जळगाव जळगावात कम्युनिटी पोलिसिंग कार्यशाळा ; ४२ पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग

जळगावात कम्युनिटी पोलिसिंग कार्यशाळा ; ४२ पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पोलीस आणि नागरिक यांच्यातील परस्पर विश्वास, संवाद व सहकार्य अधिक दृढ करून समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने जळगाव पोलीस दल आणि अनुभूती शिक्षण व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कम्युनिटी पोलिसिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून २० नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यशाळेत संवाद कौशल्य, नेतृत्व विकास आणि समाजाभिमुख पोलीसिंग या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी मिळून एकूण ४२ पोलीस अधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला.

कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग निर्माण व्हावा, तसेच पोलीस आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी व्हावा, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यशाळेच्या प्रारंभी सहभागी अधिकाऱ्यांची नावनोंदणी आणि चहापान झाले. त्यानंतर दीपप्रज्वलन, मान्यवरांचा परिचय, स्वागत आणि प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटन सत्रानंतर विविध विषयांवरील मार्गदर्शन सत्रे पार पडली.

पहिल्या सत्रात विनय वसंत मावळणकर यांनी ‘संवाद कौशल्य आणि नेतृत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रभावी संवादाचे महत्त्व, संवादाची मूलभूत तत्त्वे, नेतृत्वगुणांचा विकास आणि संघभावनेतून कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्याचे विविध पैलू त्यांनी स्पष्ट केले. पोलीस यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय राखून काम केल्यास दैनंदिन कामकाज अधिक परिणामकारक होऊ शकते, यावर त्यांनी भर दिला. दुसऱ्या सत्रात सतीश भानुदास चिंचकर यांनी ‘कम्युनिटी पोलिसिंग’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. पोलीस आणि समाज यांच्यातील समन्वय, नागरिकांचा सहभाग, जनतेशी सातत्यपूर्ण संवाद आणि समाजाभिमुख पोलीसिंगची आवश्यकता याबाबत त्यांनी माहिती दिली. गुन्हेगारी रोखणे आणि सामाजिक प्रश्न सोडविणे यासाठी केवळ पोलीस यंत्रणेवर अवलंबून न राहता नागरिकांचे सहकार्य मिळणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तिसऱ्या सत्रात प्रा. अमेय सुनील महाजन यांनी ‘कम्युनिटी पोलिसिंग : काळाची गरज आणि आपली भूमिका’ या विषयावर विचार मांडले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत कम्युनिटी पोलिसिंगचे वाढते महत्त्व, पोलीस व नागरिकांमधील विश्वासाचे नाते आणि सामाजिक जबाबदारी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. लोकसहभागाच्या माध्यमातून गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी कशा करता येतील, यावरही त्यांनी भर दिला. या कार्यशाळेला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विविध उपविभागांचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि दुय्यम अधिकारी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेच्या कामकाजात समाजाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात आला.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर सहभागी पोलीस अधिकाऱ्यांचे विविध गट तयार करून प्रात्यक्षिक उपक्रम आणि गटचर्चा घेण्यात आली. ‘एक्झिट कार्ड शीट’च्या माध्यमातून दैनंदिन पोलीस कामकाजात सुधारणा करण्यासाठी आवश्यक असलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, बाल लैंगिक अत्याचार आणि डायल ११२ यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता. या विषयांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी नवीन कल्पना, उपाययोजना आणि नाविन्यपूर्ण कार्यपद्धतींबाबत अधिकाऱ्यांनी विचारमंथन केले. कार्यशाळेच्या अखेरीस सहभागी पोलीस अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर समारोप करण्यात आला. या उपक्रमातून पोलीस अधिकारी व अंमलदारांमध्ये प्रभावी संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि नागरिकांशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने कम्युनिटी पोलिसिंगचे महत्त्व अधोरेखित झाले.

ही कार्यशाळा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले. ती यशस्वी करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत राजपूत, पोलीस अंमलदार जितेंद्र चौधरी, निलेश सिसोदे, महिला पोलीस अंमलदार मोनाली दहिभाते, अश्विनी निकम आणि जागृती काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound