Home क्राईम बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याचे धागेदोरे शोधण्यासाठी एसआयटीची धडक; उचंदे विद्यालयात तासभर कसून...

बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याचे धागेदोरे शोधण्यासाठी एसआयटीची धडक; उचंदे विद्यालयात तासभर कसून चौकशी!

0
1

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग आला असून, या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तपासाच्या अनुषंगाने विशेष तपास पथकाने (SIT) मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे येथील एस. एस. घाटे विद्यालयाला अचानक भेट दिली. गुरुवारी, दि. २० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एसआयटीचे पथक विद्यालयात दाखल झाले आणि सुमारे एक तास संस्थेच्या कामकाजासंदर्भात सखोल चौकशी करत विविध माहिती जाणून घेतली.

विद्यालयात अचानक दाखल झालेल्या एसआयटी पथकाने त्यावेळी उपस्थित असलेल्या शिक्षकांशी सविस्तर चर्चा केली. संस्थेची रचना, शिक्षक भरती आणि कामकाजाशी संबंधित विविध तांत्रिक बाबींची माहिती पथकाने यावेळी जाणून घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या चौकशीदरम्यान शाळेतील शिक्षक उपस्थित होते. आवश्यक ती प्राथमिक माहिती संकलित केल्यानंतर हे पथक पुढील तपासासाठी रवाना झाले.

बोगस शालार्थ आयडी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एसआयटी पथकाने थेट विद्यालयात जाऊन केलेल्या या अचानक तपासणीमुळे मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात चर्चेला मोठे उधाण आले आहे. या भेटीदरम्यान पथकाने नेमकी कोणती कागदपत्रे तपासली किंवा काय माहिती संकलित केली, याबाबतचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, या तपासात एसआयटीकडून विविध शैक्षणिक संस्थांची कसून माहिती घेतली जात असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, या संदर्भात संस्थेच्या अध्यक्षांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले.

बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाने (SIT) मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे येथील एस. एस. घाटे विद्यालयाला अचानक भेट देऊन सुमारे तासभर चौकशी केली. पथकाने उपस्थित शिक्षकांशी चर्चा करून संस्थेची माहिती जाणून घेतली असून, या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Protected Content

Play sound