अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वासरे येथे घराचे बांधकाम सुरू असताना विहिरीची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या बांधकाम ठेकेदाराचा पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिनेश साहेबराव कोळी (वय ३३, रा. बेटावद, ता. शिंदखेडा) असे मृत ठेकेदाराचे नाव आहे. दिनेश कोळी हे बांधकामाचे ठेके घेत होते. त्यांनी अमळनेर तालुक्यातील वासरे येथे एका घराच्या बांधकामाचा ठेका घेतला होता. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या विहिरीची मोटार सुरू करण्यासाठी ते गेले होते. यावेळी अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते विहिरीत पडले.
घटनेनंतर त्यांना विहिरीतून बाहेर काढून तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत तरुण ठेकेदाराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी मृताचे चुलतभाऊ सुरेश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ विनोद साळी करीत आहेत.



