Home राजकीय रावेर जिल्हा बँक निवडणुकीत तिरंगी सामना ! महायुतीचे राजेंद्र चौधरी, मविआचे योगीराज...

रावेर जिल्हा बँक निवडणुकीत तिरंगी सामना ! महायुतीचे राजेंद्र चौधरी, मविआचे योगीराज पाटील आणि अपक्ष रमेश पाटील मैदानात

0
5

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत रावेर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात अखेर तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून नगरसेवक राजेंद्र चौधरी, महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, तर अपक्ष म्हणून रमेश पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यातील अनेक जागा बिनविरोध झाल्याने रावेरची जागाही बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदान होणार, याबाबत निर्माण झालेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. तीन उमेदवार कायम राहिल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, मतदारांमध्येही निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्हाभरातील बारा जागा बिनविरोध झाल्याने रावेर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघाच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले होते. माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत उमेदवारांच्या नावांबाबत आणि राजकीय समीकरणांबाबत विविध चर्चा सुरू होत्या. काही मतदारांचे लक्ष दिवसभर जळगावमधील घडामोडींकडे लागले होते. रावेरची जागा बिनविरोध होणार की मतदारांना मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी मिळणार, याबाबत तालुक्यात उत्सुकता होती. अखेर माघारीची मुदत संपल्यानंतर तीन उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणूक प्रत्यक्ष होणार असल्याने काही मतदारांनी आनंद व्यक्त केल्याची आणि कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा केल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी गेल्या महिनाभरापासून रावेर तालुक्यातील चार ते पाच इच्छुकांनी प्रयत्न केले होते. सुरुवातीला अनेक नावांची चर्चा होती. मात्र, उमेदवारी निश्चितीच्या अंतिम टप्प्यात बाजार समितीचे संचालक मंदार पाटील आणि नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्यात चुरस निर्माण झाली होती. अखेर मंत्री गिरीश महाजन यांच्या निर्णयानंतर राजेंद्र चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे महायुतीतील उमेदवारीसाठी सुरू असलेल्या स्पर्धेला पूर्णविराम मिळाला असून, चौधरी यांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख योगीराज पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्यापैकी कोण निवडणूक लढवणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, अंतिम टप्प्यात रमेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तर योगीराज पाटील यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे एकाच मतदारसंघात तीन वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमधून उमेदवार आमनेसामने आल्याने निवडणुकीचे समीकरण अधिकच रंजक बनले आहे. या तिरंगी लढतीत मतदारांची विभागणी कशी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील थेट लढतीत अपक्ष रमेश पाटील यांच्या उमेदवारीमुळे नवे राजकीय गणित तयार झाले आहे. त्यांच्या उमेदवारीचा फायदा नेमका कोणाला होणार आणि कोणाच्या मतांवर त्याचा परिणाम होणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सहकार क्षेत्रातील मतदारांचा कल कोणत्या उमेदवाराकडे झुकतो, हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.


Protected Content

Play sound