Home क्राईम रावेर पोलिसांची पाल येथे मोठी कारवाई ; १ लाख ६२ हजारांचा ३...

रावेर पोलिसांची पाल येथे मोठी कारवाई ; १ लाख ६२ हजारांचा ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त, एकाला अटक

0
13

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल येथे रावेर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत तब्बल १ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगल्याप्रकरणी मेहरबान जहाँगिर तडवी (वय ३६, रा. पाल, ता. रावेर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पाल परिसरासह गांजा तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाल येथील रहिवासी मेहरबान जहाँगिर तडवी याच्या मालकीचे दुमजली घर आहे. या घराच्या प्रवेशद्वारासमोरील जिन्याखाली त्याने विक्री करण्याच्या उद्देशाने गांजासदृश अंमली पदार्थ लपवून ठेवला होता. याबाबत पोलिसांनी तपासणी केली असता एका कापडी थैलीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत हा अंमली पदार्थ आढळून आला.

पोलिसांनी तपासणीदरम्यान ३ किलो २५० ग्रॅम वजनाचा सुकलेल्या गांजाच्या झाडांच्या फांद्या आणि पानांचा समावेश असलेला अंमली पदार्थ जप्त केला. या मुद्देमालाची बाजारभावानुसार किंमत १ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या हा पदार्थ विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ईश्वर जुलालसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मेहरबान जहाँगिर तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गांजाचा साठा जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत. या कारवाईत पोलीस कर्मचारी विशाल पाटील, प्रमोद पाटील आणि सुकेश तडवी यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. पाल परिसरात गांजासारख्या अंमली पदार्थाचा साठा आढळून आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या पदार्थाचा पुरवठा कुठून करण्यात आला होता आणि त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, यासह या प्रकरणाशी संबंधित अन्य बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.


Protected Content

Play sound