Home Cities यावल अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटकपदी रविंद्र हिवरकर यांची निवड 

अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटकपदी रविंद्र हिवरकर यांची निवड 

0
7

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सावदा येथील रविंद्र हिवरकर यांची जळगाव जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भुसावळ येथे आयोजित कुंभार समाज बांधवांच्या फलक अनावरण समारंभात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन रावजी जगदाळे यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडीमुळे सावदा शहरासह परिसरातील कुंभार समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

रविंद्र हिवरकर यांनी यापूर्वी कुंभार समाज सावदा शहर अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी समाजाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. समाजबांधवांना एकत्र आणणे, विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे तसेच सामाजिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजाच्या विकासासाठी सातत्याने कार्य करण्यावर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या याच सामाजिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर जळगाव जिल्हा संघटकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुंभार समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, समाजबांधवांमध्ये समन्वय वाढविणे, सामाजिक व शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे, अशी जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

रविंद्र हिवरकर यांच्या नियुक्तीपत्रावर संस्थेचे प्रदेशाध्यक्ष बळवंत कुंभार, राज्य उपाध्यक्ष पद्माकर शिरसाट आणि राज्य सचिव योगेश हिरवकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. भुसावळ येथे झालेल्या कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पद्माकर शिरसाट, धनलाल शेठ शिरसाट, समाधान  कुंभार, राजेंद्र  खैरे, समाधान हिवरकर, जनार्दन कुंभार, मोहन सावंदे, हर्षल प्रजापती यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, समाजबांधव आणि मान्यवर उपस्थित होते.

रविंद्र हिवरकर यांच्या जिल्हा संघटकपदी झालेल्या निवडीबद्दल सावदा शहरासह परिसरातील कुंभार समाज बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कुंभार समाजाचे संघटन अधिक बळकट होऊन सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound