Home आरोग्य १६ नोव्हेंबरला जळगावात केमिस्ट संघटनेचा वार्षिक सोहळा; मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते सुनील...

१६ नोव्हेंबरला जळगावात केमिस्ट संघटनेचा वार्षिक सोहळा; मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते सुनील भंगाळे यांचा गौरव

0
7

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर्स असोसिएशन (JDMDA) ची अत्यंत महत्त्वाची वार्षिक सर्वसाधारण सभा आगामी सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जळगाव येथील महाबळ रोडवरील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत औषधी व्यवसाय क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार असून, एफडीए (FDA) आणि अँटी नार्कोटिक्स विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

या सर्वसाधारण सभेच्या प्रथम सत्रात अन्न व औषध प्रशासन (FDA) चे सहआयुक्त (जॉइंट कमिशनर) अशोक बर्डे, एफडीएचे सहायक आयुक्त प्रशांत असवार आणि अँटी नार्कोटिक्स विभागाचे प्रमुख अधिकारी रिहान शेख हे उपस्थित केमिस्ट व औषधी व्यवसायिकांना कायदेशीर बाबी आणि मार्गदर्शक सूचनांवर मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी संबंधित अधिकारी वर्गाचा विशेष सत्कार देखील जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे करण्यात येणार आहे. व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी आणि नियमांची कठोर अंमलबजावणी यावर या सत्रात प्रामुख्याने मंथन होईल.

सभेच्या द्वितीय सत्रात राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार अमोल जावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या विशेष सोहळ्यात महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांचा संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार केला जाणार आहे. तसेच या सर्वमान्य नेत्यांचे उपस्थितांना मार्गदर्शन मिळणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील औषधी व्यवसायिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि संघटनात्मक एकता अधिक मजबूत करण्यासाठी ही वार्षिक सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व केमिस्ट व औषधी विक्रेता सभासदांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर्स असोसिएशनचे मानद सचिव अनिल झंवर यांनी केले आहे.

Protected Content

Play sound