जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावमध्ये श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख गजानन प्रभाकर भोपळे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करूनही अद्याप FIR नोंदविण्यात आलेला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौघुले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव येथे ही घटना घडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त जनार्दन पवार यांनी गजानन भोपळे यांना पिस्तुल पोटाला लावून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांना मारहाण केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचेही तक्रारदाराने नमूद केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या घटनेप्रकरणी गजानन भोपळे यांनी ७ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त होऊनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणात वरिष्ठ स्तरावरून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात घटनेच्या वेळी संबंधित व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या वाहनातून रात्रीच्या सुमारास वावरत असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच संबंधित व्यक्तीच्या वेशभूषेबाबतही तक्रारीत आक्षेप नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. शासकीय पदाचा किंवा अधिकाराचा प्रभाव वापरून कायदेशीर प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौघुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), २०२३ मधील कलम १७३ (४) अन्वये तक्रारीची तातडीने दखल घेऊन संज्ञेय गुन्हा असल्यास योग्य कायदेशीर कलमांनुसार FIR नोंदविण्याचे निर्देश द्यावेत, अशी पहिली मागणी आहे. तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १०९ सह लागू होणाऱ्या योग्य कलमांचा विचार करून कायद्यानुसार कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
घटनेशी संबंधित उपलब्ध व्हिडिओ, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच वाहनातील कॅमेरा फुटेज तातडीने ताब्यात घेऊन निष्पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित पिस्तुलाचा परवाना वैध आहे की नाही आणि त्याचा वापर कायदेशीर मर्यादेत झाला आहे का, याची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, असे संघटनेने म्हटले आहे. तक्रारदार गजानन भोपळे आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर FIR नोंदविण्यास झालेल्या विलंबाची चौकशी करून यासाठी जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सामान्य नागरिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप होत असताना संबंधित तक्रारीवर पोलीस यंत्रणेकडून वेळेत कारवाई झाली नाही, तर ही कायद्याच्या राज्याच्या दृष्टीने गंभीर बाब ठरते, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. कोणत्याही व्यक्तीविरुद्ध सूडभावना नसून संबंधित व्यक्ती कितीही प्रभावशाली असली, तरी कायद्यानुसार निष्पक्ष कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका चौघुले यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने पोलीस महासंचालक कार्यालयासह सक्षम न्यायिक प्राधिकरणांकडे कायदेशीर दाद मागण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि गृहसचिव महाराष्ट्र राज्य यांनाही माहितीसाठी व उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.



