Home Cities जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्ट ; किशोरआप्पांचे पुत्र सुमित पाटील यांचा अर्ज...

जिल्हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्ट ; किशोरआप्पांचे पुत्र सुमित पाटील यांचा अर्ज वैध !

0
2

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाचोऱ्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांचे चिरंजीव सुमित किशोर पाटील यांचा यापूर्वी अवैध ठरविण्यात आलेला उमेदवारी अर्ज आता वैध ठरल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाचोरा तालुक्यातील निवडणुकीच्या समीकरणांना नवे वळण मिळणार आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सुमित किशोर पाटील यांनी पाचोरा तालुका प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तथापि, त्यांच्या उमेदवारीवर भाजपचे सतीश परशुराम शिंदे यांनी हरकत घेतली होती. या हरकतीवरील सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ३ नोव्हेंबर रोजी सुमित पाटील यांचा अर्ज अवैध ठरविला होता. यामुळे सतीश शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले होते.

या निर्णयानंतर सुमित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राजकीय दबावातून आपला अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, आमदार किशोरआप्पा पाटील यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. संबंधित विकास सोसायटीच्या लेखापरीक्षण वर्गवारीचा मुद्दा उपस्थित करून अर्ज बाद करण्यात आल्याबाबत त्यांनी आक्षेप नोंदविला होता. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग यांच्याकडे अपील दाखल करण्यात आल्याची माहिती आमदार किशोरआप्पा पाटील यांनी १० नोव्हेंबर रोजी दिली होती. या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, सुमित पाटील यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर पाचोरा सोसायटी मतदारसंघातील समीकरण बदलू शकते. मात्र, अंतिम निवडणूक चित्र अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून २९ नोव्हेंबर रोजी मतदान आणि ३० नोव्हेंबर रोजी मतमोजणी नियोजित आहे.


Protected Content

Play sound