Home Cities चोपडा चोपडा नगरीत भक्तीचा महापूर! संत बालयोगीजी महाराजांच्या सान्निध्यात भव्य कलश शोभायात्रा उत्साहात 

चोपडा नगरीत भक्तीचा महापूर! संत बालयोगीजी महाराजांच्या सान्निध्यात भव्य कलश शोभायात्रा उत्साहात 

0
चोपडा नगरीत भक्तीचा महापूर! संत बालयोगीजी महाराजांच्या सान्निध्यात भव्य कलश शोभायात्रा उत्साहात 

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा नगरीत गुरुवारी (१२ नोव्हेंबर) भक्तीमय वातावरणात भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली. पंकज समूहाच्या परिवारातील तसेच चोपडा तालुक्यातील दिवंगत आत्म्यांच्या परममुक्तीसाठी आणि आध्यात्मिक कल्याणासाठी आयोजित ‘अमृतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञा’निमित्त या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. चोपडा तालुक्याचे आराध्य दैवत परम तपस्वी संत शिरोमणी प. पू. संत श्री बालयोगीजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात हा सोहळा भक्तिभावात पार पडला.

सकाळी ९ वाजता चोपडा शहरातील गांधी चौक येथील श्रीराम मंदिरापासून कलश शोभायात्रेला प्रारंभ झाला. या यात्रेत उपनगराध्यक्ष पंकज बोरोले आणि दीपाली बोरोले यांनी सहकुटुंब उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्यासह शहरातील शेकडो माता-भगिनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर पवित्र मंगल कलश धारण करून सहभागी झाल्या होत्या.

शोभायात्रेदरम्यान ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘जय श्रीराम’, ‘हरिनाम’च्या जयघोषाने संपूर्ण चोपडा नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी उपस्थिती लावून या धार्मिक सोहळ्याचा आनंद घेतला. संत बालयोगीजी महाराज यांच्या पावन उपस्थितीमुळे शोभायात्रेला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले होते. पंकज समूह आणि जय नारायण परिवार, चोपडा यांच्या वतीने १२ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘अमृतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. या ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून भाविकांना श्रीमद् भागवत कथेचे श्रवण करण्याची संधी मिळणार आहे.

ही कथा दररोज सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत धरणगाव रोडवरील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे होणार आहे. परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून श्रीमद् भागवत कथेचा आणि संत बालयोगीजी महाराज यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संत बालयोगीजी महाराज यांच्या सान्निध्यात निघालेल्या भव्य कलश शोभायात्रेमुळे चोपडा नगरीत भक्ती आणि अध्यात्माचा उत्साह पाहायला मिळाला. १८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञामुळे शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.