Home Cities भुसावळ भुसावळमध्ये मतदार पुनरीक्षणावरून भाजपचा अनिल चौधरींवर पलटवार ; युवराज लोणारींचा घणाघात 

भुसावळमध्ये मतदार पुनरीक्षणावरून भाजपचा अनिल चौधरींवर पलटवार ; युवराज लोणारींचा घणाघात 

0
भुसावळमध्ये मतदार पुनरीक्षणावरून भाजपचा अनिल चौधरींवर पलटवार ; युवराज लोणारींचा घणाघात 

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (एसआयआर) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनिल चौधरी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय वातावरण तापविण्याचा आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न अनिल चौधरी करीत असल्याचा आरोप भाजपचे नगरपरिषदेतील गटनेते युवराज लोणारी यांनी केला. तसेच काही राजकीय बेरोजगारांकडून निवडणुकीच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने वारंवार राजकीय हवा निर्माण केली जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

अनिल चौधरी यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवराज लोणारी यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली. ही प्रक्रिया भाजपचा राजकीय उपक्रम नसून भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली राबविण्यात येणारी संवैधानिक प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदार यादीतील दुबार नावे, मृत मतदारांच्या नोंदी तसेच अन्य अपात्र नावे दूर करून मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनविणे हा एसआयआर प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. मतदार यादीत बेकायदेशीररीत्या समाविष्ट झालेल्या परदेशी नागरिकांच्या नोंदींचीही नियमानुसार पडताळणी होणे आवश्यक असल्याचे लोणारी यांनी स्पष्ट केले. विशेषतः बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या यांच्यासंदर्भातही नियमांनुसार तपासणी करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार विविध राजकीय पक्षांचे बूथस्तरीय प्रतिनिधी अर्थात बीएलए-२ नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत प्रत्येक राजकीय पक्षाला सहभागी होण्याची संधी आहे. सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी तसेच बूथस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि मतदार यादीच्या शुद्धीकरण प्रक्रियेत जबाबदारीने सहभाग नोंदवावा, असे आवाहनही भाजपच्या वतीने करण्यात आले.

भुसावळ शहरातील मतदार सुज्ञ आणि सुशिक्षित आहेत. त्यामुळे अनिल चौधरी यांच्यासारख्या व्यक्तींनी केलेल्या आरोपांना मतदारांकडून कोणतेही महत्त्व दिले जात नाही, अशी टीका करत युवराज लोणारी यांनी चौधरी यांच्यावर निशाणा साधला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत एकाही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये, यासाठी भाजप पूर्ण सहकार्य करणार असल्याचे लोणारी यांनी स्पष्ट केले. कोणत्याही पात्र नागरिकावर अन्याय होऊ नये, ही पक्षाची भूमिका आहे. त्याचवेळी मतदार यादीतील दुबार नावे, मृत मतदारांच्या नोंदी आणि अपात्र नावे यांची योग्य पडताळणी होऊन यादीतील त्रुटी दूर होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मतदार यादीतील एखाद्या नोंदीबाबत आक्षेप असल्यास नमुना क्रमांक ७ भरून नियमानुसार हरकत नोंदविण्याचा अधिकार संबंधितांना आहे. ही प्रक्रिया संवैधानिक असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणला जाऊ नये, असे लोणारी यांनी सांगितले. आक्षेप नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणी धमकावण्याचा प्रयत्न करीत असेल, तर ते सहन केले जाणार नाही. अशा प्रकारच्या घटना घडल्यास संबंधितांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, पत्रकार परिषदेत भाजपकडून मतदार यादीतील कथित दुबार नोंदींचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. भाग क्रमांक ६३ मधील संतोष छबिलदास चौधरी आणि रेखा संतोष चौधरी यांच्या नावांसंदर्भात दुबार नोंदी असल्याचा दावा करण्यात आला. रेखा संतोष चौधरी यांचे नाव मतदार यादीत ४२० क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले. या नोंदींची अधिकृत पडताळणी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

मात्र, संबंधित मतदार नोंदी खरोखरच दुबार आहेत किंवा त्यामागे कोणतीही बेकायदेशीर कृती झाली आहे का, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अधिकृत तपासणी होणे आवश्यक आहे. केवळ आरोपांच्या आधारे निष्कर्ष काढण्याऐवजी सर्व नोंदींची नियमानुसार पडताळणी करून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पत्रकार परिषदेला भुसावळ नगरपरिषदेचे गटनेते युवराज लोणारी, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेवक राजेंद्र आवटे, महेंद्रसिंग ठाकूर, निर्मल कोठारी, किरण कोलते, निक्की संत्रा, संजयकुमार नाहटा, अल्बर्ट तायडे, विशाल नाटकर, सविता मकासरे, सुजित भोळे, कैलास पाटील आणि पुरुषोत्तम नारखेडे उपस्थित होते.