यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीचा आनंद केवळ शहरांपुरता आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांपुरता मर्यादित न राहता दुर्गम आदिवासी पाड्यांवरील कुटुंबांनाही मिळावा, या माणुसकीच्या भावनेतून भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठानने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत ‘वाटीभर फराळ’ हा उपक्रम राबविला. चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पानशेवडी आणि चांदण्यातलाव या आदिवासी पाड्यांवर जाऊन प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली. या उपक्रमाचे यंदा अकरावे वर्ष असून, नवीन कपडे, फराळ, मिठाई, शैक्षणिक साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपातून वंचित कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
२०१६ मध्ये चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथे या उपक्रमाची सुरुवात झाली होती. दिवाळीच्या आनंदापासून दुर्गम भागातील आदिवासी बांधव वंचित राहू नयेत, या भावनेतून काही सदस्यांनी एकत्र येत ‘एक वाटी फराळ आणि नवीन कपडे द्या, वंचितांची दिवाळी गोड करा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. सुरुवातीला छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिक आणि दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे गेल्या अकरा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू असून, दरवर्षी सातपुड्यातील वेगवेगळ्या दुर्गम आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला जातो. यंदा पानशेवडी आणि चांदण्यातलाव या दोन आदिवासी वस्त्यांची निवड करण्यात आली होती. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या पाड्यांवर प्रत्यक्ष भेट देत आदिवासी कुटुंबांना नवीन कपडे, दिवाळीचा फराळ, मिठाई, शैक्षणिक साहित्य, नवीन भांडी, चपला तसेच थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचे वाटप केले. नवीन कपडे आणि भेटवस्तू हातात मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य, डोळ्यांतील चमक आणि आनंदाने बागडणारी पावले हे या उपक्रमाचे खरे फलित ठरले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामागे असलेला व्यापक लोकसहभाग. ‘एक वाटी फराळ आणि नवीन कपडे द्या’ या आवाहनाला दरवर्षी विविध क्षेत्रांतील नागरिक, सामाजिक संस्था, व्यापारी आणि दाते मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देतात. काहीजण स्वतः फराळ तयार करून देतात, तर काही नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देतात. अनेक दाते आर्थिक स्वरूपातही सहकार्य करतात. यंदाही दात्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे दुर्गम पाड्यांवरील आदिवासी कुटुंबांसोबत आनंदाची दिवाळी साजरी करणे शक्य झाले.
केवळ वस्तूंचे वाटप करणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून, आदिवासी बांधवांसोबत वेळ घालवणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे याला प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विशेष महत्त्व दिले. गेल्या अकरा वर्षांपासून हा उपक्रम अखंड सुरू ठेवता आला, यामागे दात्यांचा विश्वास आणि सहकार्य हीच खरी ताकद असल्याचे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सांगितले. आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत. एखाद्या चिमुकल्याच्या हातात नवीन कपडे देताना त्याच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य आणि एखाद्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होता येणे, हीच आमच्यासाठी खरी दिवाळी आहे. आनंद वाटला की तो अनेक पटींनी आपल्याकडे परत येतो, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली. दिवाळी म्हणजे केवळ घराची रोषणाई, सजावट आणि फराळ नव्हे, तर आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण करणे होय. सातपुड्याच्या कुशीत अंतर्नाद प्रतिष्ठानने गेल्या अकरा वर्षांपासून हीच माणुसकीची ज्योत तेवत ठेवली आहे. आगामी काळातही हा सेवाप्रवास अधिक व्यापक करण्याचा निर्धार प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे, समन्वयक प्रसन्ना बोरोले, समाधान जाधव, सहसमन्वयक जीवन महाजन, प्रदीप सोनवणे, कुंदन वायकोळे, हितेंद्र नेमाडे, राहुल भारंबे, ज्ञानेश्वर घुले, ललित महाजन, विक्रांत चौधरी, चंद्रकांत सूर्यवंशी, अमित कुमार पाटील, प्रा. श्याम दुसाने, अतुल चौधरी, वर्षा अहिरराव, भारती ठाकरे, अमित चौधरी, संदीप बोरोले, शिरीष कोल्हे, विपिन वारके, तेजेंद्र महाजन, राजू वारके, केतन महाजन, कपिल धांडे, स्वप्नील जावळे, हरीश भट, योगेश साळुंके, यश वारके, शर्वरी पाटील यांच्यासह अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.