नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गरीब आणि गरजू कुटुंबांच्या घरातही दिवाळीचा आनंद फुलावा, या माणुसकीच्या भावनेतून मराठी चित्रपट, मालिका व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तथा अॅड. नीलम शिर्के-सामंत यांच्या पुढाकाराने नशिराबाद येथे सुमारे २५० कुटुंबांना दिवाळीच्या शिध्याचे वाटप करण्यात आले. बालरंगभूमी परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांची दिवाळी गोड झाली.
नशिराबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष गणेश चव्हाण यांच्या मंगलमूर्ती सभागृहात गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी हा शिधावाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अॅड. नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते गरीब व गरजू कुटुंबांतील लाभार्थ्यांना दिवाळीच्या शिध्याचे वाटप करण्यात आले. दुष्काळामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अडचणीची बनली असताना या मदतीमुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी असलेल्या अॅड. नीलम शिर्के-सामंत यांनी यावेळी आपल्या सामाजिक उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “मी येथे एका मंत्र्याची पत्नी म्हणून आलेली नाही, तर एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने आलेली आहे. हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. समाजातील गरजू बांधवांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.” दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांनाही त्यांनी यावेळी धीर दिला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शेतकऱ्यांनी निराश होऊन कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये. संकटाचे दिवस कायम राहत नाहीत. आजचा कठीण काळही निघून जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि परिस्थितीशी लढण्याची जिद्द कायम ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. मात्र, आर्थिक अडचणींमुळे अनेक गरजू कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी बालरंगभूमी परिषदेच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सुमारे २५० कुटुंबांना शिध्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष गणेश चव्हाण, बरकत अली, हेमंत पाटील, डॉ. प्रमोद आमोदकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.