रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त रावेर तालुक्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत आदिवासी बांधवांसाठी विविध लोककल्याणकारी उपक्रम, शासकीय योजनांचे लाभ वाटप, आरोग्य व पोषण जनजागृती, शासकीय कागदपत्रांसाठी विशेष शिबिरे तसेच समाजाच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती आमदार नंदकिशोर महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त रावेर पंचायत समिती येथे आमदार नंदकिशोर महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सप्ताहाच्या नियोजनाची आणि विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. आदिवासी समाजातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविणे आणि त्यांना शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या सप्ताहाची सुरुवात ११ नोव्हेंबर रोजी जनजागृती व प्रसिद्धी दिनाने होणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी कल्याणकारी योजनांचा लाभ वाटप दिन आयोजित करण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी स्मारक स्वच्छता, दीपोत्सव आणि सांस्कृतिक दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

१५ नोव्हेंबर रोजी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची मुख्य शासकीय जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी नागरी सेवा व शासकीय कागदपत्रांसाठी विशेष शिबिर आयोजित केले जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांना आवश्यक शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती शिबिराच्या माध्यमातून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येईल. तर १८ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवून या सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे.
या सप्ताहामुळे आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मिळण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास मदत होणार आहे. शासकीय कार्यालयांमध्ये जाण्याची गरज कमी करून नागरिकांना विविध सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला तहसीलदार संजय तायडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, नगरसेवक पद्माकर महाजन, नगरसेविका सीमा जमादार, प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, दुर्गेश पाटील, बाळा आमोदकर, सहायक गटविकास अधिकारी वानखेडे, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अजित जमादार, आरिफ जमादार यांच्यासह विविध आदिवासी शाळांचे मुख्याध्यापक आणि प्रकल्प कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.