Home Cities जळगाव राष्ट्रवादी कामगार सेलच्या जळगाव शहर जिल्हाध्यक्षपदी विशाल देशमुख यांची नियुक्ती

राष्ट्रवादी कामगार सेलच्या जळगाव शहर जिल्हाध्यक्षपदी विशाल देशमुख यांची नियुक्ती

0
राष्ट्रवादी कामगार सेलच्या जळगाव शहर जिल्हाध्यक्षपदी विशाल देशमुख यांची नियुक्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला जळगाव शहरात अधिक बळकटी देण्यासाठी पक्षाने मोठे पाऊल उचलले असून, विशाल राजेंद्र देशमूख यांची ‘जळगाव शहर जिल्हा अध्यक्ष’ (कामगार सेल) पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी रा. खटकाळे यांनी मुंबई येथून हे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे जळगाव शहरातील कामगार चळवळीला आणि पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळाली आहे.

विशाल देशमूख यांची पक्षाप्रती असलेली अढळ निष्ठा, दांडगे संघटनात्मक कौशल्य आणि कामगार चळवळीतील सातत्यपूर्ण व सक्रिय योगदान लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. नियुक्तीपत्राद्वारे प्रदेशाध्यक्ष शिवाजी खटकाळे यांनी विश्वास व्यक्त केला की, आगामी काळात जळगाव शहर परिसरात कामगार सेलच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विशाल देशमूख अत्यंत जोमाने कार्य करतील. तसेच, शरदचंद्रजी पवार साहेबांचे पुरोगामी विचार आणि पक्षाची ध्येय-धोरणे समाजातील तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत व असंघटित कामगार वर्गापर्यंत पोहोचवण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या या निवडीबद्दल विशाल देशमूख यांनी पक्षश्रेष्ठींचे व शरदचंद्र पवार साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. जळगाव शहरातील कष्टकरी व असंघटित कामगारांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटना शहरातील घराघरांत पोहोचवण्यासाठी आपण सदैव तत्परतेने कार्य करणार असल्याचा ठाम संकल्प त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या निवडीबद्दल जळगावच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक तसेच कामगार क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.