Home प्रशासन यावल-भुसावळ राज्य महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात ; तातडीने दुरुस्तीची मागणी

यावल-भुसावळ राज्य महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात ; तातडीने दुरुस्तीची मागणी

0
यावल-भुसावळ राज्य महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात ; तातडीने दुरुस्तीची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल ते भुसावळ राज्य महामार्गाची खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अवजड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी केली आहे.

यावल शहरातील पॉईंटपासून भुसावळपर्यंतचा राज्य महामार्ग सुमारे १८ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून क्षमतेपेक्षा अधिक भार असलेल्या अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्याची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

भुसावळ हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असल्याने यावल-भुसावळ मार्गावर नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. दररोज हजारो प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असून, काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे प्रा. येवले यांनी निदर्शनास आणून दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष न करता तातडीने रस्त्याची पाहणी करावी आणि खड्डे बुजवून महामार्गाची दुरुस्ती करावी. तसेच भविष्यात पुन्हा रस्त्याची दुरवस्था होऊ नये, यासाठी दर्जेदार काम करावे, अशी मागणी प्रा. मुकेश येवले यांनी केली आहे.