Home Cities जळगाव संतवाणीपासून लावणीपर्यंत! ‘परिवर्तन’च्या दिवाळी पहाटेने जळगावकरांना केले मंत्रमुग्ध

संतवाणीपासून लावणीपर्यंत! ‘परिवर्तन’च्या दिवाळी पहाटेने जळगावकरांना केले मंत्रमुग्ध

0
संतवाणीपासून लावणीपर्यंत! ‘परिवर्तन’च्या दिवाळी पहाटेने जळगावकरांना केले मंत्रमुग्ध

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शास्त्रीय संगीताचा गोडवा, लोकप्रिय चित्रपटगीते, संतवाणीचा भक्तिरस आणि सुफी संगीताची रूहानी अनुभूती अशा विविध सुरेल रंगांची उधळण करीत ‘परिवर्तन’ संस्थेतर्फे आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या मैफलीने जळगावकरांची दिवाळीची पहाट खऱ्या अर्थाने साजरी केली.

कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुसूंद्री व फुलबाजा पेटवून करण्यात आले. याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अनिल कांकरिया, डॉ. राहुल महाजन, डॉ. सोनाली महाजन, अमर कुकरेजा, नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सोहळा भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तसेच अविरत बिल्डकॉन यांच्या अमूल्य सहकार्याने पार पडला.

खासदार स्मिता वाघ यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, आगामी दुष्काळी संकटाची जाणीव करून दिली आणि पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. आमदार सुरेश भोळे यांनी ‘अंत्योदयाची दिवाळी’ या संकल्पनेचे महत्त्व विषद केले. घरातील मोलकरीण, सफाई कर्मचारी अशा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत फराळ आणि आनंद पोहोचवला, तरच दिवाळीचा खरा आनंद साजरा होईल, असे स्मिता वाघ यांनी सांगितले. परिवर्तनच्या मंजुषा भिडे यांनी प्रास्ताविक केले.

संगीत मैफलीची सुरुवात वैष्णवी केऱ्हाळे हिने संत एकनाथ महाराजांची ‘संत भार पंढरीत’ ही रचना सादर करून केली.
त्यानंतर चारुल पाटील हिने संत मीराबाई यांची ‘एक राधा, एक मीरा’ ही रचना पेश केली. गोपाल ठाकरे, वैष्णवी आणि चारूल पाटील यांनी लाल इश्क आणि यमन रागाचा सुरेल संगम साधत ‘मेरा इश्क, तेरा इश्क, ये लाल इश्क’ हे गीत सादर करून रसिकांची मने जिंकली. ‘दमादम मस्त कलंदर’ या सुफी रचनेने मैफलीत वेगळाच रंग भरला. ‘काहे छेड मोहे’, ‘झुकी झुकी सी नजर’ या गझलेनंतर चारूल पाटील हिने सादर केलेल्या ‘तुझ्या उसाला लागलं कोल्हा’ या लावणीला रसिकांची मोठी दाद मिळाली.
चारूल आणि वैष्णवी यांनी ‘मोहे रंग दो लाल’ सादर केल्यानंतर प्रेक्षकांनी वन्स मोअरची मागणी केली. ‘हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही’ या भजनाने वातावरण भक्तिमय झाले. पुणे येथील डॉ. कुंदन इंगळे यांनी ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे लोकप्रिय गीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरेल सांगता ‘आगा वैकुंठीच्या राया’ या भैरवीने झाली.

शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटगीते ही भूषण गुरव यांची संकल्पना या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरली.
करण नाले या अवघ्या सात वर्षांच्या शिष्याने आणि त्याचे गुरु शिवम चक्रवर्ती यांनी सिंथेसायझरवर अप्रतिम संगीतसाथ दिली. दर्शन गुजराती यांनी ऑक्टोपॅड, तर राजेंद्र माने यांनी हार्मोनियमची साथसंगत केली. हर्षल पाटील यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर गेला. कार्यक्रमाची निर्मिती प्रमुख नारायण बाविस्कर आणि विनोद पाटील होते. ध्वनि यंत्रणा चिरमाडे बंधूंची होती. या कार्यक्रमासाठी शहरातील संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांना जागा न मिळाल्याने परत जावे लागले, यावरून कार्यक्रमाच्या लोकप्रियतेची पावती मिळाली.