भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या वसुबारस या सणानिमित्त गाई-वासरांचे पूजन करून गोसेवेचा संदेश देण्यात आला. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच गाय, वासरू आणि नंदीचे पूजन करून वसुबारस पावन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गोसेवकांच्या कार्याचे कौतुक करत शहरातील गोसेवा केंद्राच्या विस्तारासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शहरातील गोसेवा केंद्राला पाच वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत. या केंद्रामार्फत कत्तलीपासून वाचविलेल्या गाई, नंदी तसेच अपघातात जखमी झालेल्या मुक्या जीवांचे संगोपन आणि उपचार केले जातात. केंद्रात अशा प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यांच्या संगोपनासाठी अधिक जागेची आवश्यकता असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. याची दखल घेत मंत्री संजय सावकारे यांनी संगोपन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.

यावेळी मंत्री सावकारे यांनी गाई, वासरू आणि नंदीचे विधिवत पूजन करून त्यांना गोड नैवेद्य अर्पण केला. शहरातील श्री योगेश वासुदेव पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या जागेत अनेक मुक्या जीवांचे प्राण वाचविण्याचे कार्य सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच गोसेवक रोहित महाले आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे विशेष कौतुक केले. गोरक्षणाचे कार्य म्हणजे देवसेवेचेच कार्य आहे. गोसेवक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, धाडसाने आणि घरावर तुळशीपत्र ठेवून विश्वमातेचे रक्षण करण्यासाठी पुढे येतात. अशा सेवाभावी कार्याला समाजाने पाठबळ देणे आवश्यक आहे. रोहित महाले यांनी हे कार्य असेच सुरू ठेवावे, कोणतीही मदत लागल्यास मला फोन करा, असे आश्वासनही मंत्री सावकारे यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी गोसेवक रोहित महाले यांनी आपल्या १९ वर्षांच्या संघर्षमय गोसेवा प्रवासाला उजाळा दिला. आद्य गौरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा अभियानाच्या माध्यमातून गुरुवर्य श्री मिलिंदजी एकबोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या पावन कार्याची सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करत, प्रसंगी अनवाणी पायांनी प्रवास करून गोसेवेचे कार्य सुरू ठेवले. या प्रवासात श्री योगेश पाटील हे आमच्यासाठी देवदूत ठरले. त्यांनी आमच्या कार्याची दखल घेत श्री संत गजानन महाराज मंदिरासमोर जागा उपलब्ध करून दिली, असे महाले यांनी नमूद केले.
या जागेवर कत्तलीपासून वाचविलेल्या गाई-नंदींसह अपघातात जखमी झालेल्या मुक्या जीवांचे रक्षण आणि संगोपन केले जाते. त्यांच्या उपचारांचा वैद्यकीय खर्च तसेच संगोपनाची संपूर्ण जबाबदारी उचलली जाते. ‘मुका जीव वाचलाच पाहिजे’ हे ब्रीदवाक्य हृदयाशी बाळगून गोसेवक अहोरात्र सेवा करत असल्याचेही रोहित महाले यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हाभरातील गोसेवक, शहरातील बाळगोपाळ टीम आणि गोभक्तांनी परिश्रम घेतले. यावेळी नगरसेवक मुकेश गुंजाळ, वरुण पाटील, जीतू जाट, कुणाल शिंदे, महेंद्र पाटील, यश पाटील, दीपक फालक, दामोदर राजपूत, आदित्य धायडे, वैभव वाघे, डॉ. प्रदीप श्रीखंडे, वीरेंद्र तुरकेले, लोकेश वाणी यांच्यासह परिसरातील समस्त गोभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



