Home Cities जळगाव लोणेरे विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय उपविजेता

लोणेरे विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय उपविजेता

0
2

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने आपल्या चमकदार आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर उपविजेतेपद पटकावले आहे. या उल्लेखनीय यशामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण तालुक्यात व शैक्षणिक वर्तुळात संघाचे कौतुक होत आहे.
नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी महाविद्यालय, जळगाव येथे पार पडलेल्या या बहुमान्य स्पर्धेत विभागातील तब्बल ११ नामांकित महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी अत्यंत आक्रमक, शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवले. पहिल्या सामन्यात गुलाबराव देवकर महाविद्यालयावर मात केल्यानंतर, उपांत्यपूर्व फेरीत एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय बांभोरीच्या मजबूत संघाचा सलग दोन सेटमध्ये धुव्वा उडवत गोदावरीच्या संघाने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात गोदावरीच्या खेळाडूंनी एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय, धुळे या संघाचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. अंतिम सामन्यात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आर.सी.पी.आय.टी. महाविद्यालय, शिरपूर यांच्यात विजेतेपदासाठी तुफान आणि चुरशीची लढत पाहायला मिळाली. तीन सेटपर्यंत रंगलेल्या या रोमांचक आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात गोदावरीच्या खेळाडूंनी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज दिली. मात्र, अत्यंत अटीतटीच्या लढतीत २-१ अशा फरकाने गोदावरीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या दैदिप्यमान यशाबद्दल गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव, सर्व विभागांचे विभागप्रमुख आणि प्राध्यापकवृंद यांनी सर्व उपविजेत्या खेळाडूंचे मनापासून अभिनंदन करून त्यांना पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डी.एम. कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनीही सर्व खेळाडूंच्या कौशल्याचे व संघभावनेचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound