Home Cities जळगाव सरदार पटेल जयंतीनिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कृषी फवारणी किटचे वाटप 

सरदार पटेल जयंतीनिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कृषी फवारणी किटचे वाटप 

0
1

नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नशिराबाद येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ, बहिणाबाई ब्रिगेड आणि खानदेश बायो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कृषी फवारणी किटचे वाटप करण्यात आले. आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजूमामा भोळे होते. यावेळी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, प्रदेशाध्यक्ष प्रदीप (बंडू) भोळे, बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष हर्षा बोरोले, जिल्हाध्यक्ष सुनीता नारखेडे, स्वाती भोळे, नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश चव्हाण, नगरसेवक प्रदीप बोढरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कृषी फवारणी किटच्या वितरणासोबतच यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. शेतकऱ्यांनी शेतरस्त्यांची समस्या, वीज वितरण कंपनीकडून येणाऱ्या अडचणी, नीलगायींच्या उपद्रवामुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच वनविभागाशी संबंधित विविध प्रश्न मांडले. या समस्या ऐकल्यानंतर आमदार राजूमामा भोळे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार भोळे यांनी शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायांकडेही वळण्याची गरज व्यक्त केली. पशुधन वाढवून दुग्धव्यवसायासारखे पर्यायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि कंपन्यांनी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. कृषी फवारणी किटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणाऱ्या संबंधित संस्था आणि कंपन्यांचे आमदार भोळे यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाची प्रस्तावना मुकुंदा भाऊ रोटे यांनी केली, तर सुनीता नारखेडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंदा भाऊ रोटे, वैभव पाटील, विशाल पाटील, चंदू भाऊ पाटील, गोविंदा इंगळे, तेजस रोटे, जितेंद्र बराटे, लोकेश लोखंडे, निलेश बोंडे, भरत पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी नशिराबाद आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound