Home Cities भडगाव दुष्काळाच्या संकटापूर्वीच चारा नियोजन; भडगावात वैरण बियाणे वाटपाचा शुभारंभ

दुष्काळाच्या संकटापूर्वीच चारा नियोजन; भडगावात वैरण बियाणे वाटपाचा शुभारंभ

0
1

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यामध्ये संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी आणि पशुधनाला मुबलक चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागातर्फे १००% अनुदानावर रब्बी हंगामातील वैरण बियाणे वाटपाचा शुभारंभ पिचर्डे येथून करण्यात आला आहे. भडगाव तालुक्यात सध्या ६२ हजार ३२३ इतकी पशुधन संख्या असून तालुक्यात १८० दिवस पुरेल इतका चारा शिल्लक आहे. परंतु अल-निनोमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विशेष पुढाकाराने हे नियोजनबद्ध पाऊल उचलण्यात आले आहे.

संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर भडगाव पशुसंवर्धन विभागामार्फत तालुक्यातील प्रत्येक गावात “चारा साक्षरता व संवर्धन” अभियान राबवले जात आहे. आतापर्यंत १५ गावांमध्ये हे अभियान यशस्वीपणे पोहोचले असून उर्वरित सर्व गावांमध्येही ते राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत युरीया व गुळ प्रक्रियेद्वारे निकृष्ट चारा सकस करणे, हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या १० दिवसांत ७ ते ८ किलो हिरवा चारा मिळवणे, अझोला शेवाळ निर्मिती करून पशुखाद्याचा खर्च कमी करणे, मुरघास (सायलेज) पद्धतीने वर्षभरासाठी शास्त्रीय साठवणूक करणे आणि कडबा कुट्टी यंत्राचा नियमित वापर करणे याविषयी शेतकरी व पशुपालकांमध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे व्यापक जनजागृती केली जात आहे.

चारा लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आणि शेतकरी कुटुंबातील महिलांना शासकीय पडीक, गायरान किंवा कुळजमीन ३ वर्षांसाठी केवळ १ रुपया नाममात्र भाड्याने देण्यात येत आहे. याशिवाय V B-GRAM-G चारा लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रब्बी हंगाम २०२६ साठी सिंचन सुविधा उपलब्ध असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करून गूगल फॉर्मद्वारे मागणी नोंदवून घेण्यात आली आहे. त्यानुसार भडगाव तालुक्यातील तब्बल १५७५ लाभार्थ्यांना १००% अनुदानावर बियाणे वाटप केले जात आहे.

या उपक्रमासाठी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन धुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर आणि जिल्हा उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चारा लागवड करण्याचे आवाहन केले आहे. पिचर्डे येथील बियाणे वाटप प्रसंगी कोळगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुसंवर्धन पर्यवेक्षक डॉ. जे. एस. वानखेडे, परिचर राजू पाटील आणि पिचर्डे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यात सध्या पुरेसा चारा उपलब्ध असला तरी भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी ‘चारा साक्षरता अभियान’, पर्यायी चारा साधने आणि रब्बी बियाणे वाटप यांसारख्या उपाययोजनांमुळे तालुक्यातील पशुधन सुरक्षित राहून दुग्ध उत्पादन टिकून राहण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास भडगावचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संदीप दिलीपराव निकम यांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound