चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर-चोपडा रस्त्यावर दहीवद फाटा ते गडखांब दरम्यान झालेल्या अपघातात एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाले. यावेळी मदतीसाठी धावून आलेल्या चोपडा पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले. पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील वृद्धाला स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात पोहोचवून तत्परतेने मदत केली.
पोलीस पाटील निवडीसंदर्भातील बैठकीसाठी पोलीस निरीक्षक पवन देसले हे अमळनेर येथील प्रांत कार्यालयात जात होते. दरम्यान, दहीवद फाटा ते गडखांब दरम्यान अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अपघातात एक वृद्ध गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत मदतीच्या प्रतीक्षेत होते.

ही परिस्थिती पाहताच पोलीस निरीक्षक देसले यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले वाहन थांबविले. त्यांनी जखमी वृद्धाला स्वतःच्या वाहनात बसवून तातडीने अमळनेर येथील रुग्णालयात दाखल केले. कर्तव्याच्या निमित्ताने जात असतानाही त्यांनी माणुसकीला प्राधान्य देत दाखविलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांचे काम केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित नसून संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, याची प्रचिती या घटनेतून आली. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या या संवेदनशील कृतीमुळे चोपडा पोलिसांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.



