Home पर्यावरण रान पिकवलं, विक्रम घडवला! भडगावच्या संजय पाटलांचा महाराष्ट्रात डंका ; ज्वारीचे हेक्टरी...

रान पिकवलं, विक्रम घडवला! भडगावच्या संजय पाटलांचा महाराष्ट्रात डंका ; ज्वारीचे हेक्टरी १०२.२५ क्विंटल उत्पादन घेत पटकावला प्रथम क्रमांक

0
10

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिद्द, मेहनत, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीचे अचूक नियोजन यांच्या जोरावर शेतीतही विक्रम प्रस्थापित करता येतो, हे भडगाव तालुक्यातील माणकी येथील प्रयोगशील शेतकरी संजय पुंडलिक पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कृषी विभागाच्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेत रब्बी हंगामातील ज्वारीच्या सर्वसाधारण गटात त्यांनी हेक्टरी तब्बल १०२.२५ क्विंटल उत्पादन घेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, खान्देशातील शेतकरी वर्गातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राज्यस्तरीय पीक स्पर्धेत मिळवलेले हे यश संजय पाटील यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची आणि प्रयोगशील शेतीची पोचपावती मानली जात आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत योग्य नियोजन केल्यास ज्वारीसारख्या पिकातही विक्रमी उत्पादन घेता येते, हे त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कामातून दाखवून दिले आहे.

या विक्रमी उत्पादनामागील शेतीचे नियोजन सांगताना संजय पाटील यांनी रब्बी हंगामात एडवंटा कंपनीच्या ‘पीएसी ५३७ वर्टेक्स’ (PAC 537 Vertex) या सुधारित ज्वारीच्या वाणाची निवड केल्याचे सांगितले. पिकासाठी योग्य वाण निवडण्यापासून ते जमिनीची मशागत, संतुलित खत व्यवस्थापन आणि पाण्याचे काटेकोर नियोजन या सर्व बाबींवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. शेतीमध्ये केवळ चांगले बियाणे वापरणे पुरेसे नसून, पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य व्यवस्थापन करणेही तितकेच महत्त्वाचे असते. याच बाबींचा विचार करून संजय पाटील यांनी संपूर्ण हंगामात नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली. योग्य वाण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे त्यांना हेक्टरी १०२.२५ क्विंटल इतके भरघोस उत्पादन घेणे शक्य झाले.

संजय पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत एडवंटा कंपनीच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. कंपनीतर्फे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात त्यांच्या मेहनतीचे आणि कृषी क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करण्यात आले. या गौरव सोहळ्याप्रसंगी एडवंटा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक भूषण पाटील, कंपनी प्रतिनिधी अनिल पाटील, गावाचे पोलीस पाटील तसेच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संजय पाटील यांच्या राज्यस्तरीय यशाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.


Protected Content

Play sound