भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी भडगाव पोलीस व महसूल विभागाने संयुक्त धडक कारवाई केली आहे. या कारवाईत दोन डंपर आणि ११ ब्रास वाळूसह एकूण ४२ लाख ७८ हजार ६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ही मोहीम राबविण्यात आली.
जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष पथके तयार करून अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांच्या अनुषंगाने भडगाव पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्तपणे कारवाई केली.

मौजे गुढे, ता. भडगाव येथे २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शासनाच्या मालकीची गौण खनिज असलेली वाळू विनापरवाना वाहतूक करताना रघुनंदन एकनाथ पाटील, रा. कोठळी, ता. भडगाव यांना पकडण्यात आले. या प्रकरणी नायब तहसीलदार सुधीर किटकुळ सोनवणे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहा ब्रास वाळू आणि एक डंपर असा एकूण २१ लाख ५९ हजार ९१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई मौजे बोदडे, ता. भडगाव येथे २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.०५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. येथे शासनाच्या मालकीची गौण खनिज असलेली वाळू विनापरवाना वाहतूक करताना आढळून आली. या प्रकरणी नायब तहसीलदार सुधीर किटकुळ सोनवणे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पाच ब्रास वाळू आणि एक डंपर असा एकूण २१ लाख १८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवायांमध्ये एकूण ११ ब्रास वाळू आणि दोन डंपर जप्त करण्यात आले असून, जप्त मुद्देमालाची एकत्रित किंमत ४२ लाख ७८ हजार ६८ रुपये आहे. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून, पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.



