Home प्रशासन किनगावातील RSS पथसंचलनावरील दगडफेकीचा वरणगावात निषेध ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

किनगावातील RSS पथसंचलनावरील दगडफेकीचा वरणगावात निषेध ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

0
16

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथे २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा वरणगाव येथे निषेध नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती भाग्यश्री महेश सोनवणे आणि सकल आदिवासी कोळी समाज, भुसावळ तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात २ नोव्हेंबर रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

किनगाव येथे २५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. हे संचलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असताना काही व्यक्तींनी त्यावर दगडफेक केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करत निवेदनकर्त्यांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

वरणगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मधील नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती भाग्यश्री महेश सोनवणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक, वरणगाव पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदनात संबंधित घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना जिल्ह्यात किंवा राज्यात घडू नयेत, यासाठी दोषींवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकल आदिवासी कोळी समाज, भुसावळ तालुका यांच्या वतीनेही स्वतंत्र निवेदन देण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश सुपडू सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात पथसंचलनावरील दगडफेकीचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई करून शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी जळगाव आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती निवेदनकर्त्यांनी केली आहे.

निवेदनावर महेश सोनवणे, भाग्यश्री सोनवणे, किरण अशोक सोनवणे, ऋतिका राजधर तायडे, रुपाली गोपाल तायडे, रविंद्र सोनवणे, संतोष सोनवणे, हिरामण तायडे, गोपाल पंढरीनाथ तायडे, धनराज विलास कोळी, ललित कोळी, हर्षल संजय कोळी, सानू कोळी, देवेंद्र अनिल कोळी, हर्षले कोळी, हर्षल सुनील कोळी, भूषण अरुण तायडे आणि सागर कोळी यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.


Protected Content

Play sound