Home क्राईम गोवंश कत्तल प्रकरणी पोलिसांचा दणका; दोघे सहा महिन्यांसाठी हद्दपार!

गोवंश कत्तल प्रकरणी पोलिसांचा दणका; दोघे सहा महिन्यांसाठी हद्दपार!

0
18

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात अवैध गोवंश कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असलेल्या टोळीतील प्रमुखासह एका महिला सदस्याला सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये ही कारवाई करण्यात आली.

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये मुक्तार जमाल कुरेशी (वय ४०, टोळीप्रमुख) आणि परवीनबी मुक्तार कुरेशी (वय ४५, टोळी सदस्य) या दोघांचा समावेश आहे. दोघेही ३६ खोल्या, फातेमा नगर, जळगाव येथील रहिवासी आहेत.

जिल्ह्यात अवैध गोवंश कत्तल, गोमांस विक्री तसेच जनावरांना ठार मारणे आणि विकलांग करण्यासारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी संबंधित टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.

या टोळीविरुद्ध एमआयडीसी आणि नशिराबाद पोलीस ठाण्यांत महाराष्ट्र पशुसंवर्धन व पशुसंरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता थेट हद्दपारीचे पाऊल उचलले आहे.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दोघांना २७ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील सहा महिन्यांसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.


Protected Content

Play sound