फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची १५१ वी जयंती आणि भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची ४२ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात दोन्ही महान नेत्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांच्या हस्ते भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडे यांच्या हस्ते भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला राष्ट्रीय सण व उत्सव समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उत्पल चौधरी, राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, प्रा. डॉ. योगेश तायडे, प्रा. डॉ. शेरसिंग पाडवी, नितीन सपकाळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या सदस्या प्रा. पूनम कोल्हे यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपल्या कुशल नेतृत्वाचा आणि मुत्सद्दी धोरणांचा वापर करून त्यांनी ५६५ हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण घडवून आणले. त्यांच्या या ऐतिहासिक योगदानामुळे भारताला अखंड राष्ट्राचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होणे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रा. कोल्हे यांनी नमूद केले.
तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी आपल्या धाडसी निर्णयक्षमतेच्या आणि कणखर नेतृत्वाच्या जोरावर देशाला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली. देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे मतही प्रा. पूनम कोल्हे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार भूगोल विभागप्रमुख प्रा. दीपक पाटील यांनी मानले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याचे आणि इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचे स्मरण करून धनाजी नाना महाविद्यालयात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



