बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन शासनाकडून वारंवार केले जात आहे. मात्र, शिरसाळा ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन फुटलेल्या असल्याचे दिसून येत असून, त्यातून पाण्याची नासाडी होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. यावर उपाययोजनांची मागणी करण्यात येत आहे.
याबाबतचे वृत्त असे की, एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या जात असताना दुसरीकडे पाइपलाइनमधून पाणी वाया जात असल्याने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना फुटलेल्या पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती का केली जात नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करून गळती शोधणे आणि तातडीने दुरुस्ती करणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन गावातील सर्व पाइपलाइनची पाहणी करावी, गळती त्वरित बंद करावी आणि पाण्याची होणारी नासाडी थांबवावी, अशी मागणी होत आहे.
दुष्काळात पाणी वाचविण्याचे आवाहन केवळ नागरिकांपुरते मर्यादित न राहता ग्रामपंचायत प्रशासनानेही त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



