Home क्राईम मेहुणबारे पोलिसांचा अवैध वाळू चोरीवर दणका ! १४ लाखांचा डंपर आणि वाळूसाठा...

मेहुणबारे पोलिसांचा अवैध वाळू चोरीवर दणका ! १४ लाखांचा डंपर आणि वाळूसाठा जप्त ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
21

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी होताच अवैध वाळू उत्खनन आणि चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. चाळीसगाव तालुक्यातील कळमडू गावाजवळ अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर मेहुणबारे पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत १४ लाख ६ हजार रुपये किमतीचा डंपर आणि एक ब्रास शासकीय गौण खनिज वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर अवैध वाळू उत्खनन आणि चोरी करणारे सक्रिय होण्याची शक्यता लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष पथके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. अवैध वाळू उत्खनन, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती संकलित करून अवैध वाळू चोरीविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस पथकाकडून परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते.

दरम्यान, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी मेहुणबारे पोलीस पथकाला विश्वासनीय बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली. कळमडू गावातील कुंभार रोडलगत महेश दिनकर सूर्यवंशी हा डंपरमधून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महेश दिनकर सूर्यवंशी हा कोणताही वैध पास अथवा परवाना नसताना शासनाच्या मालकीची गौण खनिज वाळू डंपरमध्ये भरून तिची वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संबंधित डंपर आणि त्यातील वाळू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या टाटा सिग्मा डंपरची किंमत १४ लाख रुपये असून, एक ब्रास शासकीय गौण खनिज वाळूची किंमत सहा हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण १४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार आणि विक्रम पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


Protected Content

Play sound