Home प्रशासन किनगाव प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा ; वंचित बहुजन आघाडीचे यावल पोलीस ठाण्यासमोर...

किनगाव प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा ; वंचित बहुजन आघाडीचे यावल पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

0
25

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । किनगाव येथे २५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनांची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणात दगडफेक केल्याच्या आरोपावरून अनेक निष्पाप तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत, केवळ दोषींवरच कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २९) यावल पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आदिवासी तडवी-भिल्ल, मुस्लिम तसेच मागासवर्गीय समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत किनगाव प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रमाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. यासंदर्भात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना निवेदनही देण्यात आले. निवेदनात सर्वप्रथम पथसंचलनाच्या परवानगीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पथसंचलनासाठी कोणत्या अधिकाऱ्यांनी आणि कोणत्या आधारावर परवानगी दिली, मार्ग निश्चित करताना स्थानिक परिस्थिती तसेच संभाव्य कायदा-सुव्यवस्थेचा विचार करण्यात आला होता का, याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पथसंचलनासाठी करण्यात आलेला मूळ अर्ज, परवानगी आदेश आणि संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दगडफेक प्रकरणाची चौकशी करताना नेमकी कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या परिस्थितीत दगडफेक झाली, याची वस्तुनिष्ठ तपासणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, घटनास्थळावरील व्हिडिओ फुटेज आणि डिजिटल पुरावे तपासण्यात आले आहेत का, याची माहिती द्यावी. तसेच तडवी आदिवासी समाजातील तरुणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमधील पुरावे तपासून प्रत्येक संशयिताची भूमिका स्वतंत्रपणे पडताळावी आणि निर्दोष व्यक्तींवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेदरम्यान महिलांवर झालेल्या कथित लाठीमाराचाही मुद्दा आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. महिलांवर लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले, कारवाईपूर्वी घटनास्थळी नेमकी परिस्थिती काय होती आणि पोलिसांनी कारवाई करताना निर्धारित नियमांचे पालन केले होते का, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. चौकशीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या कथित विटंबनेचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला. या प्रकरणाचीही गांभीर्याने दखल घेऊन सत्य परिस्थिती समोर आणण्याची मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला. “पोलीस ठाण्यात आंदोलन करू नका, आम्ही निष्पाप लोकांवर कारवाई करणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक मोईनोद्दीन सैय्यद, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, एम. जे. शेख, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound