Home Cities भुसावळ वरणगाव, तळवेल, फुलगावच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? ओझरखेड धरणाचे पाणी भोेगावती नदीत सोडण्याची...

वरणगाव, तळवेल, फुलगावच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? ओझरखेड धरणाचे पाणी भोेगावती नदीत सोडण्याची मागणी

0
3

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल, फुलगाव आणि भोेगावती नदी परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणी व सिंचनासाठी दिलासा मिळावा, यासाठी ओझरखेड धरणातील उपलब्ध पाणी भोेगावती नदीत सोडण्याची मागणी भाजपचे नगरसेवक शुभम सुधाकर जावळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन दिले आहे.

भुसावळ तालुक्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतजमिनींच्या पेरणीसाठी आणि पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, अपुऱ्या पावसामुळे तसेच भूजल पातळीत घट होण्याच्या शक्यतेमुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध राहील की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.

वरणगाव, तळवेल, फुलगाव आणि भोेगावती नदी परिसरातील शेती मोठ्या प्रमाणावर सिंचनाच्या उपलब्ध साधनांवर अवलंबून आहे. वेळेत पाणी उपलब्ध न झाल्यास रब्बी हंगामातील पेरणीवर परिणाम होण्याबरोबरच उगवलेल्या पिकांच्या सिंचनाचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी भूमिका शुभम जावळे यांनी निवेदनातून मांडली आहे.

ओझरखेड धरणातील उपलब्ध पाण्याचा विचार करून भोेगावती नदीपात्रात आवश्यक तेवढे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नदीपात्रात पाणी सोडल्यास नदीकाठच्या परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होऊ शकते. परिणामी, रब्बी हंगामातील पेरणी आणि पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित विभागाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा. उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करताना शेतीच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहनही शुभम जावळे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound