Home Cities यावल पीक विम्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; आमदार अमोल जावळे यांचे निर्देश

पीक विम्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; आमदार अमोल जावळे यांचे निर्देश

0
4


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पीक विमा अर्ज भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत असून, आता अत्यल्प कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे यावल, रावेर आणि मुक्ताईनगरसह मतदारसंघातील एकही पात्र शेतकरी पीक विम्याच्या संरक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि तत्परतेने काम करावे, असे निर्देश आमदार अमोलभाऊ जावळे यांनी दिले. पीक विमा अर्ज प्रक्रियेतील अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांचे अर्ज मुदतीत भरून घेण्याच्या दृष्टीने आयोजित ऑनलाइन बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला आमदार अमोल हरीभाऊ जावळे, आमदार नंदूभाऊ महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, प्रांताधिकारी बबन काकडे, यावल, रावेर व मुक्ताईनगरचे तहसीलदार, यावल व रावेरचे तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सहकारी बँकांचे प्रतिनिधी तसेच सीएससी सेंटरचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

बैठकीत पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि विविध विभागांतील समन्वय यावर चर्चा करण्यात आली. अंतिम मुदतीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

पीक विमा अर्जासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतच मुदत

ज्या शेतकऱ्यांची डिजिटल पीक पाहणी अद्याप ऑनलाइन झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी घोषणापत्राच्या आधारे ३१ ऑक्टोबरपर्यंत पीक विमा अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले. अंतिम मुदत जवळ आल्याने शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यास विलंब करू नये, तसेच आवश्यक कागदपत्रांसह प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असेही सांगण्यात आले.

बँक किंवा सहकारी संस्थांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज संबंधित बँका व संस्थांनी भरून घेण्याची कार्यवाही करावी. पीक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर अर्ज भरून घ्यावेत. अर्ज भरताना तांत्रिक अडचणी उद्भवल्यास ग्रामस्तरीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले.

डिजिटल पीक पाहणी १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन

डिजिटल पीक पाहणी अद्याप पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरल्यानंतर १० नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. पीक विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर, तर डिजिटल पीक पाहणी पूर्ण करण्याची मुदत १० नोव्हेंबर आहे. या दोन्ही स्वतंत्र प्रक्रिया असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित मुदतींचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षक यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संपर्क साधावा. पीक विमा अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करावे आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश आमदार अमोल जावळे यांनी दिले.

पीक विमा अर्जासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने प्रशासन, कृषी विभाग, बँका, सहकारी संस्था आणि सीएससी केंद्रांनी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळावे आणि कोणताही शेतकरी केवळ प्रक्रियात्मक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

 


Protected Content

Play sound