Home आरोग्य सातपुड्याच्या दुर्गम भागातून वैद्यकीय क्षेत्रात गरुडझेप ! वाघझिराच्या मोहिनी भुगवाड्या एम.डी. उत्तीर्ण

सातपुड्याच्या दुर्गम भागातून वैद्यकीय क्षेत्रात गरुडझेप ! वाघझिराच्या मोहिनी भुगवाड्या एम.डी. उत्तीर्ण

0
7


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील अतिदुर्गम वाघझिरा गावातील आदिवासी कुटुंबातील कन्या डॉ. मोहिनी नवादी मालसिंग भुगवाड्या यांनी वैद्यकीय शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एम.डी. (रेडिओलॉजी) परीक्षेत ७० टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे वाघझिरा गावासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सातपुड्याच्या दुर्गम भागातील वाघझिरा गावातून वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवणाऱ्या मोहिनी या गावातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी वैद्यकीय शिक्षणात मिळवलेले यश हे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

डॉ. मोहिनी यांचे वडील मालसिंग भुगवाड्या हे नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या आई मालोद, ता. यावल येथील उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून सेवा बजावत आहेत. आई-वडिलांच्या शैक्षणिक आणि आरोग्यसेवेच्या पार्श्वभूमीमुळे मोहिनी यांना समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळाली.

अतिदुर्गम भागातून वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास पूर्ण करत एम.डी. परीक्षेत ७० टक्के गुण मिळवणे ही मोहिनी यांच्या मेहनतीची आणि जिद्दीची पावती आहे. त्यांच्या यशामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाविषयी नवी प्रेरणा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

डॉ. मोहिनी भुगवाड्या यांच्या या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. दुर्गम वाघझिरा गावातील या कन्येने वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले यश गावासाठी अभिमानाची बाब ठरले आहे.

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या वाघझिरा गावातील डॉ. मोहिनी भुगवाड्या यांनी एम.डी. परीक्षेत ७० टक्के गुण मिळवत यशाची नवी उंची गाठली असून, त्यांचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 


Protected Content

Play sound