Home Cities जळगाव दिवाळीत भेसळखोरांची खैर नाही! मनसेचा FDA ला ७ दिवसांचा अल्टिमेटम; आंदोलनाचा इशारा

दिवाळीत भेसळखोरांची खैर नाही! मनसेचा FDA ला ७ दिवसांचा अल्टिमेटम; आंदोलनाचा इशारा

0
13


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या सणात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई करा, अन्यथा मनसेच्या रोषाला सामोरे जा, असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मिठाई, मावा, खवा, खाद्यतेल आणि फराळाच्या पदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाला यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत ठोस कारवाई सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दिवाळीच्या काळात मिठाई, मावा, खवा, सुकामेवा, खाद्यतेल आणि विविध फराळाच्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा अस्वच्छ वातावरणात तयार केलेले खाद्यपदार्थ विकले जाण्याची शक्यता असते. अशा पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि विक्रीवर प्रशासनाने विशेष लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.

मिठाई दुकाने, हॉटेल्स अन् गोदामांची तपासणी करा!

जळगाव जिल्ह्यातील मिठाईची दुकाने, हॉटेल्स, बेकरी, फराळ विक्री केंद्रे, शीतगृहे आणि खाद्यपदार्थांची साठवणूक करणाऱ्या गोदामांची तातडीने तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष बाजारपेठेत उतरून संशयास्पद खाद्यपदार्थांची तपासणी करावी. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय आढळल्यास त्यांचे नमुने घेऊन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मुदतबाह्य पदार्थ आणि भेसळखोरांवर कठोर कारवाईची मागणी

अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे अन्नसुरक्षा परवाने आणि नोंदणी तपासावी. मुदतबाह्य पदार्थांची विक्री, अस्वच्छतेत अन्ननिर्मिती, निकृष्ट कच्च्या मालाचा वापर किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका मनसेने मांडली आहे. सणाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही हलगर्जी होऊ नये, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तपासणीचा अहवाल जनतेसमोर जाहीर करा!

विशेष तपासणी मोहिमेत पारदर्शकता राखण्यावरही मनसेने भर दिला आहे. प्रशासनाने केलेल्या तपासण्या, गोळा केलेले नमुने, प्रयोगशाळेतील निष्कर्ष आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात केलेली कारवाई याबाबतची माहिती नियमितपणे जनतेसमोर प्रसिद्ध करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांमध्ये जागरूकता वाढण्यासोबतच खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत विश्वास निर्माण होण्यास मदत होईल, असे मनसेचे म्हणणे आहे.

राजेंद्र निकम, ॲड. जमील देशपांडे, विनोद शिंदे यांचा पुढाकार

मनसेचे उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे आणि महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन सादर केले. दिवाळीच्या काळात नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळणे आवश्यक असून, त्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली. याप्रसंगी उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, चेतन पवार, आशुतोष जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

सात दिवसांत कारवाई सुरू करा, अन्यथा आंदोलन!

अन्न व औषध प्रशासनाने पुढील सात दिवसांच्या आत मागणीची दखल घेऊन विशेष तपासणी मोहीम सुरू करावी, अशी स्पष्ट भूमिका मनसेने घेतली आहे. निर्धारित मुदतीत ठोस कारवाई सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे मनसेच्या या निवेदनानंतर अन्न व औषध प्रशासन कोणती भूमिका घेते आणि दिवाळीपूर्वी तपासणी मोहीम कितपत प्रभावीपणे राबवते, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

 


Protected Content

Play sound