Home Cities जळगाव जळगाव बायपासचा प्रश्न आता थेट ‘गडकरी वाड्या’पर्यंत ; छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे नागपुरात...

जळगाव बायपासचा प्रश्न आता थेट ‘गडकरी वाड्या’पर्यंत ; छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे नागपुरात उपोषण !

0
15


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील खचलेला उड्डाणपूल, त्याच्या दुरुस्तीला होत असलेला विलंब आणि त्यातून निर्माण झालेला अपघातांचा गंभीर प्रश्न आता थेट केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील ‘गडकरी वाड्या’पर्यंत पोहोचणार आहे. जळगावकरांच्या जीविताशी संबंधित या प्रश्नाकडे गडकरी यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने २१ नोव्हेंबर रोजी नागपुरातील गडकरी वाड्यासमोर लोकशाही व शांततापूर्ण मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील मागण्यांचे निवेदनही नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयात देण्यात आल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल कुचकामी आणि दर्जाहीन कामामुळे सुमारे चार महिन्यांपूर्वी खचल्याचा आरोप छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केला आहे. त्यानंतर या महामार्गावरील अवजड वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आली. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच शहरातील महामार्गालगतच्या समांतर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. गेल्या चार महिन्यांत या वाढलेल्या वाहतुकीमुळे अनेक अपघात घडले असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दहा निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा दावा पत्रकात करण्यात आला आहे. त्यातच २३ ऑक्टोबर २०२६ रोजी खचलेल्या पुलाजवळ सुरू असलेल्या कामादरम्यान क्रेन कोसळून संबंधित क्रेनचालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. एवढ्या गंभीर घटना घडूनही खचलेल्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला अपेक्षित गती मिळत नसल्याबद्दल छत्रपती शिवाजी ब्रिगेडने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जळगाव कार्यालयाने या जीवघेण्या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन वाहतूक सुरक्षित करण्यासाठी तसेच दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र या प्रकरणात अत्यंत मंद गतीने कार्यवाही होत असून निष्क्रियता दिसून येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यामुळे आता जळगावकरांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या थेट हस्तक्षेपाची गरज असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. भविष्यात आणखी निष्पाप नागरिकांचे जीव जाऊ नयेत यासाठी गडकरी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी ब्रिगेडने पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. खचलेल्या उड्डाणपुलाची तातडीने तांत्रिक तपासणी करून त्याच्या सुरक्षिततेबाबतचा अहवाल सार्वजनिक करावा, ही पहिली मागणी आहे. तसेच पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पुलाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत जळगाव शहरातून वळविण्यात आलेल्या अवजड वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. नागरिकांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी तिसरी मागणी आहे. यासोबतच उड्डाणपुलाच्या बांधकामाचा दर्जा, वापरण्यात आलेले साहित्य, पुलाची देखभाल, तांत्रिक तपासणी तसेच दुरुस्तीच्या कामात झालेला विलंब या सर्व बाबींची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. या चौकशीत दोषी आढळणारे संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि अन्य जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केली आहे.

या मार्गावरील अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकरणांची अधिकृत माहिती संकलित करावी आणि पीडित कुटुंबांना नियमानुसार मदत व नुकसानभरपाई मिळण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी पाचवी मागणी करण्यात आली आहे. “नागरिकांच्या जीवितापेक्षा कोणतेही विकासकाम मोठे असू शकत नाही,” अशी भूमिका छत्रपती शिवाजी ब्रिगेडने मांडली आहे. महामार्गावरील खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीला होत असलेला विलंब आणि त्यातून निर्माण झालेली वाहतुकीची समस्या ही केवळ प्रशासकीय बाब नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित अत्यंत गंभीर बाब असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. जळगावकरांनी वारंवार या समस्येकडे लक्ष वेधूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाल्याचे पत्रकात म्हटले आहे.

आता हा प्रश्न स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पातळीपुरता मर्यादित न ठेवता थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडण्याचा निर्णय छत्रपती शिवाजी ब्रिगेडने घेतला आहे. जळगावकरांच्या जीविताला सुरक्षा आणि न्याय मिळावा, या गंभीर परिस्थितीकडे गडकरी यांनी वैयक्तिक लक्ष घालावे आणि संबंधित यंत्रणेला तातडीने कार्यवाही करण्यास भाग पाडावे, या मागणीसाठी शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथील गडकरी वाडा कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जळगावकरांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक हस्तक्षेप करतील, असा विश्वासही छत्रपती शिवाजी ब्रिगेडने व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे जळगाव शहरप्रमुख किरण बोरसे यांच्या वतीने ही माहिती प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound