
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात दुर्गा विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर रात्रीच्या सुमारास प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक सागरकुमार सुनील चौधरी यांच्यावर चौघांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चावडी चौकाजवळ सागर कांबळे यांच्या घरासमोर हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात चौधरी यांच्या डाव्या कानाला तसेच पोटाच्या डाव्या बाजूला दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

फिर्यादी सागरकुमार चौधरी (वय ३३, रा. गुरववाडा, यावल) हे व्यवसायासोबतच समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असून, गेल्या वर्षभरापासून ते यावल नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक म्हणून काम पाहत आहेत. यंदाच्या दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध मंडळांच्या विसर्जन व्यवस्थेचे नियोजन आणि अडचणी सोडविण्यात ते सहभागी होते. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी यावल शहरातील दुर्गा विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू झाली होती. फिर्यादीनुसार, त्यांच्या प्रभागातील १९ मंडळांचे विसर्जन बाकी होते. दुपारी साडेतीन वाजेपासून मंडळांच्या विसर्जनातील अडचणी सोडविण्याचे काम सुरू होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली आणि सुमारे ४० मंडळांनी त्यात सहभाग घेतला. जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेनुसार रात्री दहा वाजेच्या सुमारास सर्व मंडळांची वाद्ये व बँड पथके बंद झाली.
यानंतर रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास सागर चौधरी हे पायी घरी जात असताना चावडी चौकाच्या दिशेने पुढे जाताना सागर कांबळे यांच्या घरासमोर रस्त्यावर चौघे उभे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये विलास रमेश चौधरी, गोपाल नारायण चौधरी, अक्षय गोपाल चौधरी आणि दिनेश गोपाल चौधरी यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीनुसार, विलास चौधरी याने पांढऱ्या रंगाची स्कूटी समोर आणून रस्ता अडविला आणि सागर चौधरी यांना उद्देशून, अपशब्द वापरून शिवीगाळ केली. त्यानंतर चौघांनी मिळून पकडून मारहाण केल्याचा आरोप आहे. या वेळी दिनेश चौधरी याने हातातील लाकडी फळीने डाव्या कानावर मारल्याचे, तर अक्षय चौधरी याने हातातील धारदार चाकूसारख्या वस्तूने पोटाच्या डाव्या बाजूला वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्याच वेळी रस्त्याने जाणारे नरेंद्र माळी आणि राहुल चौधरी यांनी जखमी सागर चौधरी यांना मोटारसायकलवरून यावल पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले. या प्रकरणी सागर चौधरी यांनी विलास रमेश चौधरी, गोपाल नारायण चौधरी, अक्षय गोपाल चौधरी आणि दिनेश गोपाल चौधरी यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. यावल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, तपासाची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल सुनील रमेश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्याची नोंद प्रथम माहिती अहवालात आहे.



