Home प्रशासन नगरपालिका यावल शहरात डास प्रतिबंधक फवारणीची नगरसेविका नंदाताई महाजन यांची मागणी

यावल शहरात डास प्रतिबंधक फवारणीची नगरसेविका नंदाताई महाजन यांची मागणी

0
18


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील सर्व प्रभाग, वाड्यावस्त्या आणि गल्ल्यांमध्ये डास प्रतिबंधक औषधांची फवारणी तसेच धूरफवारणी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका तथा गटनेत्या नंदाताई राजेंद्र महाजन यांनी यावल नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांनी हे निवेदन सादर केले.

शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका टाळण्यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असून, शहरातील सर्व भागांमध्ये स्वच्छता आणि डास नियंत्रणासाठी प्रभावी कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावल शहरातील सर्व प्रभाग, वाड्यावस्त्या, अंतर्गत गल्ल्या, गटारींचा परिसर तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी डास प्रतिबंधक औषधांची योग्य प्रमाणात फवारणी करण्यात यावी. आवश्यकतेनुसार धूरफवारणीही करण्यात यावी. ही मोहीम केवळ काही ठरावीक भागांपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण शहरात राबविण्यात यावी, अशी भूमिका नंदाताई महाजन यांनी मांडली आहे. यासोबतच शहरातील गटारींची नियमित स्वच्छता करणे, साचलेल्या पाण्याचा निचरा करणे आणि डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणीही त्यांनी केली आहे. फवारणीचे काम नियमित आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या कामावर देखरेख ठेवून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा महत्त्वाचा विषय असल्याने नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती नंदाताई राजेंद्र महाजन यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.


Protected Content

Play sound